पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १ - विषयाची प्रस्तावना संपूर्ण जगभरात स्त्रियांना आपण पुरूषांच्या बरोबरीच्या आहोत हे सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे, एकही देश यास अपवाद नाही. अगदी जेथे लोकशाहीची निर्मिती झाली, त्या इंग्लंडमध्ये देखील स्त्रियांना मताच्या अधिकारासाठी ३०० वर्षे लढा द्यावा लागला होता. परंतु भारत हा गंमतीशीर विरोधाभासाने उभा राहिलेला देश आहे. हा एकमेवदेश आहे की, जेथे बाकायदा, मनुस्मृती नावाचे पुस्तक लिहून समाज, राजकारण, अर्थकारण, जातीव्यवस्था कशी चालवावी हे लिहिले गेले आणि त्यानुसार तेथे संस्कृती चालत व वागत आली. सदर पुस्तकात एक संपूर्ण श्लोक लिहून श्लोकांच्या शेवटी लिहिले आहे, “न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हती” म्हणजेच स्त्री स्वातंत्र्याच्या लायकीची नाही. हाच विचार घेवून येथे संपूर्ण कुटुंब व्यवस्था ही पुरूषसत्ताक विचाराने उभी राहिली. जाती व्यवस्थेसह स्त्री माणूस आहे, या विश्वासाला अनेक समाजसुधारकांनी बळ दिले व स्त्रियांना स्वत्वाची जाणीव करून दिली. यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, महर्षि कर्वे, सावित्री फुले, शाहु महाराज अशी अनेक नांवे घेता येतील. स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधी यांनी स्त्रियांना सर्वप्रथम राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सन १९४२ च्या चळवळीतील 'चले जाव' चा नारा दिल्यानंतर जेव्हा सर्व पुरूष नेत्यांना अटक झाली, त्यावेळी सरोजिनी नायडू, अरूणा असफली या महिला नेत्यांनी स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेल्याचे दिसते. संपूर्ण आयुष्यभर एक पुरूष असूनही दलित समाजात जन्मास आल्यामुळे सतत हिनतेची वागणूक मिळत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशाच्या राज्य घटना समितीचे अध्यक्ष झाले म्हणूनच दलितांसह स्त्रियांना राज्यघटना अंतर्गत समानतेच्या वर्तणुकीची ग्वाही मिळाली. राज्य घटनेच्या पहिल्या पानावर प्रस्ताविकेत डॉ. आंबेडकरांनी या देशात धर्म, जात, लिंग भेद केला जाणार नाही, सर्वाना विकासाच्या समान संधी मिळतील, अशी ग्वाही दिली. ६३ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो, तेव्हा स्त्रियांच्या संदर्भातील अनेक चांगल्या योजना, कायदे व नियम तयार झाले व अस्तित्वात आले. एक महिला राष्ट्रपती झाली व राष्ट्रपती जो शब्दच मुळी पुल्लींगी आहे, त्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. -: ५ :