पान:गद्यरत्नमाला.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शकुंतलेची गोष्ट.

९१


 सेना व इतर राजचिन्हें एकीकडे ठेवून राजा, प्रधान व पु- रोहित यांस बरोबर घेऊन आश्रमांत गेला. आंत जाऊन पाहतो तों जिकडे तिकडे यज्ञयागादि कर्मै चालली आहेत; वेदघोष व सामगायन चाललें आहे, व्याकरण, न्याय, मीमांसा इत्यादि वि- यांवर वादविवाद होत आहेत. असें पाहून राजा केवळ स्वर्गसु- खांत निमग्न झाला. आश्रमांत पुष्कळ सुंदर देवालयें होतीं त्यांत जाऊन देवतांची राजानें पूजा केली; आणि प्रधान व पुरोहित यांस बाहेर ठेवून साक्षात् काश्यपाच्या राहण्याच्या आश्रमांत रा- जानें प्रवेश केला. आंत गेल्यावर राजास महर्षीचे दर्शन झालें नाहीं; व इकडे तिकडे पाहतो तों कोणी मनुष्य दृष्टीस पडेना. तेव्हां 'येथे कोण आहे?' अशी राजाने मोठी आरोळी मारिली. राजाचा शब्द ऐकून एक स्वर्गस्त्रीसारखी सुंदर ऋषिकन्या बाहेर आली; आणि राजास पाद्य, आसन वगैरे देऊन चालीप्रमाणे राजाचा सत्कार करून खुशाल आहांना ? आगमनाचे कारण काय ? असें तिनें राजास विचारिलें. तिचें मधुर भाषण ऐकून राजा म्हणाला, " हे सुंदर ऋषिकन्ये, भगवान् कण्वऋषींचें दर्शन घेण्यास आलों आहें, तो कोठें आहे तें मला सांग."
 शकुंतला म्हणते, माझा पिता फळे आणण्याकरितां गेला आहे. आपण दोन घटका वाट पहावी; तो लवकरच येईल.
 असें ती बोलल्यावर राजा कांहीं वेळ स्तब्ध बसला, परंतु ऋषीच्या आश्रमांत ही सुंदर स्त्री तपस्वी होऊन राहिली आहे, असें पाहून राजास आश्चर्य वाटले आणि त्यानें तिला विचारिलें, " हे तास्वीकन्ये, तुजकडे पाहिलें असतांच मनोहरण करणारी रूपवती व गुणवती अशी तूं कोणाची आहेस हें सांग."
 असें राजाचें भाषण ऐकून शकुंतला किंचित् हंसून म्हणाली- तपस्वी, धैर्यवान, धर्मज्ञ, असा जो महात्मा कण्व त्याची मी कन्या आहें.
 दुष्यंत — सर्व लोक ज्यास मान देतात, असा जो भगवान्