पान:गद्यरत्नमाला.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
गद्यरत्नमाला.


गले. भयानें नानाप्रकारचे शब्द करूं लागले, राजा व इतर वीर एकमेकांस शिकारीचे कौशल्य दाखविण्याकरितां पुष्कळ हिं- सक पशूंचा नाश करीत तेव्हां हत्ती वगैरे मोठाले भयंकर पशु भिऊन पळू लागले. कांहीं तर भयानें रक्त ओकून जागच्या- जागींच मेले. कांहींनीं पिसाळून पुष्कळ येद्वेहि मारले. या प्रमाणे पारधीची गर्दी चालली असतां राजा एका चपल मृगाच्या पाठीमागे लागून फार लांब जातां जातां दुसऱ्या एका अरण्यांत गेला. तेथेंहि चोहोकडे ओसाडी पाहून राजा अगदीं थकून गेला. क्षुधा तृपा यांनी अगदीं व्याकुळ झाला. हरिणामागें धांवत आहे इतक्यांत त्याने एक दुसरें सुशोभित वन पाहिलें. तें पाहून राजाचें मन गार झालें, दृष्टि शांत झाली. जिकडे तिकडे सुगंध शीतळ वारा झुळझुळ वाहत आहे, अनेक प्रफुल्लित वृक्षां- वर बसून कोकिलादि पक्षी सुस्वर शब्द करीत अहेत; वृक्षांच्या विस्तीर्ण छायेंत स्वस्थ बसून पशु रवंथ करीत आहेत. सर्व ऋतूं- तील पुष्पांनीं भरलेल्या वृक्षांची जिकडे तिकडे गर्दी असल्यामुळे किंचित् वान्याच्या झुळुकेनें पुष्पवृष्टि चोहोंकडे चालली आहे; एके बाजूनें नदी वाहत आहे. ही सर्व शोभा पाहून राजाचे सर्व श्रम दूर झाले. इतक्यांत वनाच्या मध्यभागी एक सुंदर आश्रम राजाच्या दृष्टीस पडला. आश्रमाच्या भोवताली वृक्षांची शोभा केली आहे; आंत अग्निहोत्राचे अग्नि प्रज्वलित झाले आहेत; सं- न्यासी, ऋषि, चोहोंकडे स्वकर्मे करीत बसले आहेत; मोठेमोठे क्रूर पशुहि पाळलेल्या पशूंप्रमाणे शांत होऊन बसले आहेत; आ- श्रमाच्या समीपभागींच मालिनी नदी वाहत आहे; व तिच्या वाळवंटावर चक्रवाकादि अनेक पक्षी क्रीडा करीत आहेत, तीरा- वर बसून ऋषि वेदाध्ययन करीत आहेत; असा आश्रम पाहून साक्षात् स्वर्गच आपल्या दृष्टीस पडला की काय, असे राजास वाटून आश्रमांत जाऊन महर्षि काश्यप यांचे दर्शन घेण्याची त्यास इच्छा झाली.