Jump to content

पान:गद्यरत्नमाला.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुस्मृति.

७९


 आपल्या देशांत धर्मशास्त्रप्रवर्तक ऋषि पुष्कळ झाले. या स्मृतिकार म्हणतात; व त्यांच्या ग्रंथांस स्मृति असें म्हणतात. सर्व धर्माचें मूळ वेद, त्यांतील धर्म स्मरून स्मरून जे ग्रंथ लिहिले त्यांचें नांव स्मृति, असा अर्थ शास्त्रज्ञांनीं केला आहे. अलीकडील विद्वान असा अर्थ करतात कीं, स्मृति म्हणजे ध्यानांत ठेविलेले ग्रंथ. यावरून स्मृतिकाळाच्या वेळेस लेखनकला नव्हती, असें तें अनुमान करतात. यांत सत्य किती असेल तें असो. परंतु सामान्यतः स्मृतिशब्दाच्या अर्थाचें जुन्या ग्रंथकारा - नींच जर वर सांगितल्याप्रमाणे विवरण केलें आहे, तर तो लेख नकलेच्या अभावाचा द्योतक आहे असें म्हणतां येत नाहीं. सुमारें पन्नास साठ स्मृतिकारांची नांवें आढळतात. कित्येकांचीं नांवें व वचनें इतर ग्रंथांत मात्र आढळतात, परंतु ग्रन्थ उपलब्ध नाहींत. इतरांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सर्वात मनु मुख्य होय.
 मनूला अमुक वर्षे झाली, असें निश्चयात्मक सांगतां येत नाहीं. तो सर्व ऋषींमध्ये प्राचीन आहे इतकें मात्र प्रत्यक्ष प्रमाणासारखें उघड आहे, कारण, जें कांहीं मनु बोलला तें ग्राह्य असा वेदांत सुद्धां मनूचा उल्लेख आढळतो. भरतखण्डाच्या इतिहासांतील इतर गोष्टींप्रमाणे मनूच्या उत्पत्तीचा काळ ठरविण्याविषयीं अलीकडील विद्वानांनीं अनेक अनुमानें केलीं आहेत; त्यांत कित्येक स्थली सत्याचा आभास दिसतो, तरी एकंदरीत कल्पना- तरंग फार. कारण, कित्येक वेळां एखाद्या गोष्टीच्या काळाचें अनुमान करतेवेळेस परस्परांमध्ये चार पांचशे वर्षांचें अंतर पडते. त्यामुळे हीं अनुमानें सत्याची स्थापना न करितां परस्परास खोडून मात्र टाकितात.
 आचार, व्यवहार, हे नेहमी देशकालभेदानें बदलतात. एका देशांत जो आचार, तोच दुसऱ्या देशांत अनाचार. एका देशांत न्याय्य तेंच दुसऱ्या देशांत अन्याय्य अशी अव्यवस्था सर्व काळी सर्व देशांत आहे, व मन्वादिकांच्या काळापासून आपल्या