पान:गद्यरत्नमाला.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भर्तृहरि

५५


 विद्या हेंच मनुष्याचें उत्तम सौंदर्य होय. विद्या हेंच सुरक्षित धन, विद्या उपभोग देणारी, कीर्ति करणारी, सुख करणारी, विद्या गुरूंचा गुरु, परदेशीं जाण्यास विद्या हाच मित्र होय. विद्या मोठी देवता होय, विद्येचा मान राजांमध्यें सुद्धां होतो, धनाचा होत नाहीं. विद्याविहीन मनुष्य केवळ पशु होय.
 स्वजनांविषयीं दक्षता, दुसऱ्याविषयीं दया, दुर्जनांचे ठायीं निष्ठुरता, साधूंविषयीं प्रीति, राजाचे ठायीं नीति, विद्वानांचे ठायीं सरळपणा, शत्रूच्या ठायीं शौर्य, वडिलांविषयीं सहनशीलता, स्त्रियांविषयीं धूर्तता, हे गुण ज्या कुशल पुरुषांमध्ये असतात, त्यांमुळेच जगाची राहाटी चालते.
 बुद्धीचा जडपणा हरण करिते, खरें बोलण्यास शिकविते. मान वाढविते, पाप घालविते, चित्त प्रसन्न ठेविते, लोकांत कीर्ति वाढविते. याप्रमाणे सत्संगति पुरुषांचें काय करीत नाहीं ?
 सदाचरणी पुत्र, पतिव्रता बायको, कृपा करणारा धनी, प्रीति करणारा मित्र, प्रामाणिक सेवक, स्वस्थ अंतःकरण, सुन्दर शरीर, निश्चल ऐश्वर्य, विद्येनें उज्ज्वलित असें मुख, हीं सर्व, स्वगीत क्रीडा करणारा देव प्रसन्न झाला असतां, मनुष्यांस प्राप्त होतात.
 हिंसेपासून निवृत्ति, परधन न घेण्याचा नियम, सत्य भाषण, योग्य काळी शक्तीप्रमाणें दान, परस्त्रीभाषणाविषयीं मुकेपणा, निर्लोभ, वडिलांच्या ठायीं नम्रता, सर्व प्राण्यांवर दया, हा सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेला असा श्रेयः संपादनाचा सामान्य मार्ग आहे. यापासून कोणत्याहि धर्माचें आचरण करण्यास बाध येत नाहीं.
 विघ्नें येतील म्हणून हलके लोक काम आरंभीतच नाहींत, मध्यम असतात ते विघ्नें आलीं म्हणजे सोडून देतात; उत्तम असतात ते विघ्नें पुनः पुनः आलीं तरी आरंभिलेलें कार्य सोडीत नाहींत.
 प्रिय आणि न्याय्य आचरण, प्राण गेला तरी पाप न करणें, दुष्टांजवळ याचना न करणें, स्नेही असूनहि गरिबीत असला तर