पान:गद्यरत्नमाला.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुधारणा.

४३


 वकील हे न्यायाचे खांब आहेत. न्यायाधीश चांगला असूनही वकील गैरहुशार अथवा अप्रामाणिक असेल तर न्याय होत नाहीं. वकील कायद्यांत हुशार असून बोलण्यांत हुशार पाहिजेत. घोंटा - ळ्याचा खटला असला, म्हणजे खरें इंगित काढण्यास वकिलांनी झटले पाहिजे. परंतु कित्येक वेळां असें होतें कीं वकील आपल्या पक्षाचा कमीपणा छपविण्याकरितां, आपल्या हुशारीनें न्यायाधी- शांच्या डोळ्यांत धूळ घालतात. यामुळे न्याय बरोबर होत नाहीं. प्राचीन काळीं, युरोपांत रोमन लोकांच्या राज्यांत वकिलांची फार प्रतिष्ठा असे. याचें कारण असें सांगतात कीं, कायद्याचे कचाटत सांपडून एकाद्या मनुष्यास उगाच पीडा होत असली, तर ते निरपेक्षबुद्धीनें आपल्या विद्येच्या व वक्तृत्वाच्या बलानें त्याचें रक्षण करीत. सांप्रत, वकिली हा पोट भरण्याचा धंदा झाला आहे. पैसे मिळाले म्हणजे खटला खोटा असला तरी, तो खरा करून दाखविण्यास वकील मागें पुढे पहात नाहींत. श्रीमंत आणि गरीब यांमध्ये वाद असला म्हणजे, गरीबाजवळ हुशार वकिलांस देण्यास पुष्कळ पैसा नसल्यामुळे त्यास न्याय मिळण्याची पंचाईत असते. खरा न्याय व्हावा, अशी इच्छा बाळगणारे वकील असल्याशिवाय न्याय व्हावयाचा नाहीं. लोकांच्या जीवांचें व मालमत्तेचें रक्षण व्हावें ह्या कायद्याच्या उद्देशाप्रमाणे न्यायाधीश व वकील या उ- भयतांनीहि वागले पाहिजे, तरच तो सिद्धीस जाईल.

सुधारणा.


 आलीकडे मराठी भाषेत सुधारणा हा शब्द प्रचारांत आला आहे. नव्या व जुन्या सर्व लोकांच्या मुखांतून सुधारणा हा शब्द निघतो, तथापि उभयतांचा त्याच्या अर्थाविषयीं वेगळा समज आहे. याकरितां त्याच्या सामान्य अर्थाविषय थोडासा विचार करूं.
 सुधारणा म्हणजे चांगल्या स्थितीस येणें. एकादी बिघड- लेली वस्तु नीट झाली, म्हणजे ती सुधरली असें ह्यणतात. जसें