पान:गद्यरत्नमाला.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
गद्यरत्नमाला.


करणें हा दुर्गुण आहे, ती केली असतां राजा शासन करतो, म्हणून चोरी न करणें हा मोठा विलक्षण अप्रतिम गुण नाहीं; व याबद्दल कोणी कोणाची स्तुति करीत नाहीं, व राजा चोरी न करणाऱ्यास बक्षीस देत नाहीं. कारण, चोरी न करणें हें प्रत्ये- काचें कर्तव्यच आहे. इतर न्यायाधीश लांच घेऊन अन्याय करतात, त्यांच्या मानानें लांच न घेतां न्याय करणारे चांगले हैं। खरें; तथापि चांगले न्यायाधीश लोकांचें बरें करतात असें म्हणतां येत नाहीं. कारण, मनुष्य आपल्या वेळेचा अथवा वित्ताचा व्यय आपणांस कांहींएक नफा नसतां करतो, तेव्हांच दुसऱ्याचें तो हित करतो असें होतें. असो, हें ऐहिकदृष्ट्या झाले. परमार्थदृष्टीने पाहिले तर मोठ्या स्थितीपासून एक मोठा तोटा आहे; तो असा. श्रीमंतींत खाण्यापिण्याच्या सुखांत चैनीनें दिवस जात असले, म्हणजे ईश्वराची मनुष्यास आठवण न होऊन तो त्याचें भजन करीत नाहीं. मग वार्धक्यांत इंद्रियें विगलित होऊन अनुकूल असतांहि सुखोपभोग करण्याची शक्ति रहात नाहीं; तेव्हां पश्चात्ताप होऊन ईश्वरभक्ति करणार तो मरू- नहि जातो.
 एकंदर सर्व गोष्टींचा विचार करितां असें सिद्ध होतें कीं, ईश्वर सर्वज्ञ आहे, आपणांस कोणती स्थिति योग्य हे आपणां- पेक्षां त्यास अधिक समजतें, असें मानून ज्या स्थितीत तो ठेवील, तींत आपले कर्तव्य करून, होईल तितकें परहित करून स्वस्थ व आनंदित अंतःकरणानें काळ घालविणें हेंच मनुष्यांस ऐहिक व पारमार्थिक सुखाचें साधन आहे.

न्यायाधीश आणि वकील.


 कायद्याप्रमाणे न्याय करणें न्यायाधीशाचें काम आहे. कायदा नवा करणें अथवा चालू कायद्यांत फेरफार करणें हें न्याया- धीशाचें काम नाहीं. म्हणजे साक्षीदारांच्या व इतर प्रासंगिक