पान:गद्यरत्नमाला.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
गद्यरत्नमाला

.

बिघडतात. आईबापांनी मुलांशीं नेहमीं गांभीर्याने वागले पा हिजे, थट्टेने॑ सुद्धां त्यांच्याशीं खोटें बोलूं नये.याचप्रमाणें गुरूनें विद्यार्थ्यावर पहिल्यापासून आपला दाब ठेविला पाहिजे. गांवांत पहिल्या पिढीचे लोक चांगले असले म्हणजे पुढल्या पिढीचें आचरण सहज चांगलें होतें. देशांतील लोक चांगले होण्यास राजा व बडे लोक यांनी चांगले वागले पाहिजे, एरव्हीं देशांतील लोकांची सुधारणा होणार नाहीं. सुधारणारूप नदीचा उगम राजदरबार होय. तेथेंच पाणी गढूळ असले तर, मग खालीं स्वच्छ कोठून होणार ? चांगल्या चाली पाडणें हाणजे चांगले कायदे करणेच आहे. चाल व संवय यांच्या योगानें मनुष्यांस कोणतीहि गोष्ट वाईट वाटावयाची नाहीं.

उच्चस्थिति.


 मनुष्यस्वभाव सर्वकाळी सर्व देशांत सारखाच आहे. ज्या स्थितींत ईश्वराने आपणास ठेविलें आहे, तींत संतोषानें राहणारा जगांत एक सुद्धां मनुष्य सांपडणे कठीण. कोणत्याहि देशांत गेलें तरी हीच गोष्ट आढळते. ज्यांस वेळेस अन्न मिळण्याची भ्रांति अशा लोकांनी खात्यापित्या मनुष्याकडे पाहून, त्याची स्थिति आपणास असावी, अशी इच्छा केली, तर ती गोष्ट वे- गळी. पण ज्यांपाशीं व्यवस्थेनें राहिलें असतां, दोनचार पिढ्यांपर्यंत चांगल्या रीतीनें निर्वाह होईल, इतकें द्रव्य असतें, असे मनुष्य सुद्धां अधिक मोठ्या पदाची इच्छा धरून अस्वस्थ अंतःकरणानें काळ घालवितात, हें केवढे आश्चर्य आहे ! मनु- घ्यांनीं मोठेपणाची इच्छा धरूं नये असें ह्मणणें नाहीं. कारण ती तर मनुष्यांत असणे आवश्यक आहे. ही स्तुत्य इच्छा मनु- ध्यांमध्यें नसती तर जगांत शेंकडो मनुष्यांच्या हातून अक्षय सत्कृत्यें झाली आहेत तीं झालीं नसतीं. आपल्या हातून सत्कृत्यें व्हावी याकरितां मोठेपणाची इच्छा धरून न्याय्य रीतीनें