पान:गद्यरत्नमाला.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
गद्यरत्नमाला.


 एकाएकीं पैसा मिळवून एकाद्याची भरभराट झाली तरी तो आळशी असला तर, पूर्वस्थितीवर येतो. यास उदाहरणें श्रीमं- तांच्या घराण्यांत पुष्कळ सांपडतील.
 उद्योगानें महत्त्वास आलेले दूरदर्शी लोक दैवानें आम्हांस ही स्थिति प्राप्त झाली, असें म्हणतात, हें त्यांचें शहाणपण होय. परंतु ते दैवावर भरंवसा ठेऊन चालतात, असे लोकांनीं समजूं नये. कित्येक कृत्ये आरंभितेवेळेस जयच मिळेल अशी खात्री नसते, तेथे दैवावर भरवसा ठेऊन उद्योग करावा. कार्यसिद्धि न झाली तर, दैवास बोल लावून चित्त समाधानयुक्त ठेवावें. अशा प्रसंगीच दैव मानण्याचा थोडा बहुत उपयोग आहे म्हटले तर चालेल. बाकी सतत उद्योग करणें हेंच मनुष्यांचे कर्तव्य होय. मनुष्यांच्या प्रयत्नाशिवाय प्राप्त होणारी सुखसाधनें ईश्व रानें फारच थोडीं ठेविलीं आहेत. त्यानें पंचमहाभूतें मनुष्यांस दिलीं आहेत; त्यांपासून मनुष्यांनी आपले हित करून घ्यावें, असा त्याचा उद्देश दिसतो. केवळ दैवावर भरवसा ठेवून चा- लल्यानें हित झाल्याचें जगांत उदाहरण सांपडत नाहीं, परंतु तारायंत्र, आगगाडी, सुताचीं वगैरे यंत्रे, अमेरिका खंडाचा शोध, सुएज संयोगीभूमीचा कालवा, हिंदुस्थानांत इंग्लिशांचे साम्राज्य, इत्यादि उद्योगानें अनेक अतर्क्य कृत्ये झाल्याचीं उदा- हरणें आहेत.

संवय आणि चाल.


 ज्या गोष्टी मनुष्याला करावयाच्या असतात त्यांचा तो नेहमीं विचार करितो; ज्या गोष्टी तो बालपणापासून शिकलेला असतो त्या सर्वदा त्याच्या बोलण्यांत येतात. मनुष्याची वागणूक त्याच्या संवयीवर आहे. त्यास लहानपणापासून संवय लावावी तशी लागते. संवय हा सर्वात मोठा गुरु होय. संत्रयीनें स्वभाव सुद्धां बदलतो. संवयीसारखा दुसरा जुलमी राजा कोणीच नाहीं.