पान:गद्यरत्नमाला.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४
गद्यरत्नमाला.


समुद्रांत प्राण्यांच्या जाती कमी आहेत, परंतु त्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांचं आयुष्य व आकार स्थलचरापेक्षां अधिक असतात, असे शोधक लोकांचें मत आहे. स्थलचरांमध्ये हत्ती मोठा आहे; परंतु समुद्रांत व्हेल नांवाचा मासा असतो त्याशीं तुलना केली तर हत्ती फार लहान आहे असें वाटेल. व्हेल मासा साठ सत्तर हात लांब असतो, आणि तो युरोपांतील ओक झाडाप्रमाणे शे दोनशे वर्षे वांचतो असें म्हणतात.
 नौकागमनादिक जे वर उपयोग सांगितले त्यांपेक्षांहि समुद्रापा- सून मोठा उपयोग आहे. तो असा:- सूर्यकिरणांच्या उष्णतेनें समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन आकाशांत जाऊन तिचे ढग होतात, आणि ते पर्जन्याचे रूपानें खालीं पडतात. यामुळे सर्व स्थावरजंगम सृष्टीचं जीवन होते. जमिनीप्रमाणेच समुद्रांत डोंगर, खडक, झाडे, वगैरे रचना आहे. बेटे हीं समुद्रांतील पर्वतांची शिखरे आहेत, असें कित्येक लोकांचे म्हणणे आहे. समुद्रामध्ये नवेनवे चमत्कार नेहमी दृष्टीस पडतात. यावरून असें वाटतें कीं, मनुष्यास माहीत नाहीत अशा हजारों अद्भुत गोष्टी समुद्रांत आढळतील.
 सर्व भूगोलावर दोनतृतीयांशांवर समुद्र पसरला आहे. जमि- नीचे जसे महाद्वीपें, खंडे, देश, प्रात असे कृत्रिम विभाग मानि- ले आहेत, तसेच समुद्राचेहि विभाग मानिले आहेत. समुद्राचे मुख्य विभाग चार मानिले आहेत. उत्तर महासागर, दक्षिण महासागर, अतलांतिक महासागर व पासिफिक महासागर या मुख्य व इतर समुद्रांच्या पोटविभागांची वर्णने भूगोलशास्त्रांत सविस्तर सांगितलीं आहेत. वर सांगितलेले अनेक उपयोग मनांत आणू- नच समुद्रास संस्कृतभाषेत रत्नाकर हे नांव दिले असावे.

जनावरांची भाषा.


 आपल्या मनास जें वाटतें तें दुसन्यास कळवितां यावे याकरि