१७१
नाहीं, इतका सैलपणा असून वाऱ्याने ती कधीं उडत नाहीं. तसेच सर्वप्रकारच्या वनस्पति व्हावयासाठीं तींत मातीचे अनेक भेद ठेविले आहेत. कोठे काळी माती, कोठें तांबडी, कोठें चिकट, कोठे भुसभुशीत, असे अनेक भेद आहेत. कित्येक ठिकाणीं विटा वगैरे इमारतीत सामान करण्याची व कित्येक ठिकाणीं मडकी करण्याची मातीच पुष्कळ असते. काव वगैरे कांहीं मातीचेच प्रकार आहेत; त्यांचा रंगांच्या व औषधांच्या कामांत उपयोग करतात. पृथ्वीचा आकार गुळगुळीत नसून तीवर पुष्कळ डोंगर व दन्या आहेत, यांपासूनहि मोठा उपयोग आहे. कित्येक झाडे व जनावरें अशीं आहेत कीं, तीं डोंगराशिवाय दुसरे ठिकाणी व्हावयाचींच नाहींत. तसेच कित्येक खनिज पदार्थ बहुतकरून डोंगरांत होतात. त्याचप्रमाणे झरे वगैरे उदकाचे प्रवाह डोंगरापासून उत्पन्न होतात. जमिनींत धोंडे आहेत, ते घरे बांधण्यास, चुना व कांच तयार करण्यास उपयोगी पडतात. धातूंचे उपयोग तर असंख्य आहेत. फार काय पण त्यांशिवाय मनुष्याचे चालावयाचें नाहीं. संसारांतील कोणतीहि वस्तू घेतली तरी ती तयार करण्यास साक्षात् किंवा परंपरेनें तरी लोखंडादिक धातूंची गरज लागली नाहीं, अशी कोणती वस्तु आहे ? मीठ वगैरे निर्वाहास अवश्य लागणारे पदार्थ जमिनींत उप्तन्न होतात. फार काय, पण ज्वालामुखी, धरणीकंप, यांपासून अनेक अनर्थ होतात; तथापि त्यांपासूनहि मनुष्यांचे पुष्कळ नफे होतात. पृथ्वीच्या पोटीं जो अग्नी उत्पन्न होतो, तो ज्वालामु खीच्या द्वारे बाहेर न पडल्यास मोठाले अनर्थ होतील. कित्येक गोष्टींचा हेतु आपणांस कळत नाहीं, हें आपले अज्ञान होय. सृष्टीचा विचार करून परमेश्वराचे चातुर्य मनांत आणते वेळेस प्रत्येक वस्तूचा स्वतंत्र विचार करितां कामा नये: परंतु एकंदरीत सर्वांचा उपयोग मनांत आणिला पाहिजे. कित्येक गोष्टी ज्या आपणांस अपकारक वाटतात, त्या वस्तुतः उपकारक असतात.