पान:गद्यरत्नमाला.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
गद्यरत्नमाला


असणार नाहीं. स्वहिताच्या उद्योगांत जें सुख असतें, तें स्वहि- तांत नाहीं. विश्रांति गोड लागते खरी, पण केव्हां ? श्रम केल्यानंतर. फार वेळ मन निरुद्योगी ठेविलें तर त्याची ग्राहक- शक्ति कमी होते. शेवटीं ज्या विश्रांतीपासून आळशी मनुष्य सुखाची इच्छा करीत असतो, ती विश्रांतीच त्यास त्रासरूप होते. जगांत ज्यांस थोडाबहुत अनुभव आहे, त्यांनी विचारपूर्वक पाहिलें तर त्यांस कळेल कीं, आळशी मनुष्यांपेक्षां उद्योगी मनु- ष्यांस अधिक सुख होतें. घरीं, दारी, मंडळींत, कोठे असला तरी, आळशी मनुष्य मंद व उदास असतो. उद्योगी मनु- यांच्या अंगची तरतरी व आनंदवृत्ति त्याच्या अंगी नसते. आळशी मनुष्याचा लोकांस त्रास येतो, आणि उद्योगी मनुष्य सर्वांस आवडतो.
 वर सांगितल्याप्रमाणें आळसापासून फार तोटे आहेत, हें मनांत आणून सर्वांनी योग्य उद्योग करावा. आळसाचा प्रवेश न होऊ देण्याविषयीं सर्वदा सावध असले पाहिजे. कामाच्या वेळा बांधून नेमलेल्या वेळी नेमलेले काम काळजीनें करून पर- मेश्वरानें इहपरलोक साधण्याची जीं अनेक साधनें आपणांस दिली आहेत, त्यांचा उपयोग करावा. उदरनिर्वाहाकरितां स- वस उद्योग तर करावा लागतोच; तथापि निर्वाहास पुरे इतकें काम करून ज्यांस पुष्कळ वेळ सांपडेल असे पुष्कळ लोक आ- हेत. अशा वेळेस करण्याकरितां नेहमीं कांहीं तरी एखादें चांगलें काम जवळ असावें. दुःख व दारिद्र्य यांचें मूळ आळस व सुख व संपत्ति यांचे मूळ उद्योग; हें सर्वदा ध्यानांत ठेवावें. सर्वानी आपल्या निर्वाहापुरताच उद्योग करावयाचा असें मनांत आणले असते तर आज ज्या सुखांत आपण आहों तें सुख आपणांस कधीं प्राप्त झाले नसतें. निर्वाहापेक्षां अधिक उद्योग करणारे लोक ज्या देशांत फार होतात, तोच देश उदयास येतो. प्राचीन का- लचे आर्यलोक निर्वाहापुरताच उद्योग करणारे असते तर, त्यांच्या