पान:गद्यरत्नमाला.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८
गद्यरत्नमाला

.

होईल यांत संशय नाहीं. तरी एकादें सुख नाहींसें झाल्यामुळे हैं दुःख झालें असें म्हणतां येईल काय ? बरें पोटशूळास आप- णास वाटेल तेव्हां सुख किंवा दुःख, असें पाहिजे तें नांव देतां येईल काय ?

ठळक मजकूर


 आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः || आळशी मनुष्याचें जन्म व्यर्थ होय. त्याच्याने जगांत स्वहित किंवा परहित कांहींच होत नाहीं. आळशी मनुष्याची समजूत पहिल्यापासूनच चुकीची असते. त्यास वाटतें, आपणास उद्यो गी नाहीं असें लोक म्हणतील तर ह्मणोत बिचारे; आपण तर स्वस्थ आहों. त्यास वाटतें उगाच दगदग करून शरीरास पीडा देणारे लोक मूर्ख, ते कधीं सुखी व्हावयाचे नाहींत. दोन दिवस आ- युष्य आहे तो स्वस्थ बसावें हें चांगलें. वस्तुतः विचार केला तर या सर्व गोष्टीच त्यास प्रतिकूल होतात. मनुष्य आळशी झाला ह्मणजे त्याचा चांगलेपणा मिळविण्याचा मार्ग खुंटतो. नानाप्रकारचा मूर्खपणा त्याच्या अंगांत शिरतो. शेवटीं ज्या सुखासाठीं ह्मणून तो उद्योग सोडून देतो, त्या सुखास देखील अपात्र होतो.
 आळशी मनुष्याचें शरीर किंवा मन यांची सुधारणा मुळींच होत नाहीं. मनुष्यस्थिति आणि सृष्टिनियम यांचा विचार केला असतां, असें दिसून येईल कीं, कोणतेंहि सत्कार्य किंवा महत्कार्य उद्योग आणि श्रम यांशिवाय व्हावयाचें नाहीं. उद्योग कधीं कधीं निष्फल होतो, ही गोष्ट खरी; तथापि उद्योग न केला अ- सतां कांहींच व्हावयाचें नाहीं. अधिक बळकट असतो त्याचाच लढाईमध्ये जय होतो असा नियम नाहीं; तथापि अंगांत कांहीं बळ असल्याशिवाय कोणासहि दुसन्याशीं टक्कर देतां येणार नाहीं. विद्या शिकून मनाची सुधारणा करावयाची झटली तरी शिक-