पान:गद्यरत्नमाला.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
गद्यरत्नमाला.


कडे लागले आहे. याकरितां माझी इच्छा पूर्ण कर. आपला बंधु, मित्र सर्व आपणच, याकरितां त्वां आत्मदान केलें तर अधर्म होणार नाहीं. ब्राह्म, दैव इत्यादि आठ विवाह मनूनें सांगितले आहेत. त्यांत गांधर्वविवाह क्षत्रियांस अगदीं प्रशस्त आहे; तर त्याप्रमाणे आज त्वां माझा स्वीकार करावा.
 शकुंतला- - आपण सांगतां हा धर्म आहे, व मी आपलें दान करण्यास स्वतंत्र आहे. तर मी आपले म्हणणे मान्य करितें. परंतु माझी एक विनंति आहे, ती आपण कबूल केली पाहिजे. ती विनंति ही की, मला जो पुत्र होईल तोच आपल्या मागें गादीचा मालक व्हावा.
 हें तिचे मागणे राजानें कबूल करून गांधर्व विधीनें तिचें पाणिग्रहण केलें. कांहीं कालपर्यंत तिशीं क्रीडा करून तुला आ पल्या नगरांत नेईन, तुला पट्टराणी करीन, तुझ्या योग्यतेप्रमाणें तुझा मान ठेवीन, तुला न्यावयास चतुरंग सेना पाठवीन, अर्शी पुष्कळ विश्वासाचीं वचनें बोलून आपण मागें असें कृत्य केलें, याबद्दल कण्व आपणास काय ह्मणेल ? अशी मोठी भीति मनांत आणून राजा आपल्या नगरास परत गेला.
 इकडे राजा गेल्यावर कांहीं वेळाने ऋषि आश्रमास आला; परंतु शकुंतला लाजून रोजच्याप्रमाणे पुढे गेली नाहीं. तेव्हां दिव्य दृष्टीनें लजेचें कारण पाहून ऋषि आनंदित झाला, आणि शकुंतलेस म्हणाला,
 क्षत्रियांस गांधर्व विवाहच श्रेष्ठ आहे. तुम्हा उभयंतांची परस्पर प्रीति जमून विवाह झाला, हें फार चांगलें झालें. दुष्यंत मोठा धर्मात्मा व पराक्रमी आहे. त्यापासून तुला पुत्र होईल तो मोठा विजयी होईल. समुद्रवलयांकित पृथ्वीचें राज्य एकटा करील. त्यास कोणी शत्रु होणार नाहीं."
 याप्रमाणें कण्व बोलल्यावर शकुंतलेनें पाय धुऊन त्याची पूजा केली, आणि म्हणाली.