पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

विश्वविद्यालयाला प्रो. कर्व्यांची विस्मृति होणें शक्य झालें असतें काय ? मानांचा वर्षाव ज्यांच्यावर होतो त्यांनी कर्व्यांच्या शतांशानें तरी कांहीं करून दाखविलें आहे काय ? अशी ही ठाकरी युनिव्हर्सिटी " शिक्षणा- मृत " पाजीत आहे असें म्हणणे धाडसाचें नव्हे काय ? शब्दाचा मार शहाण्यांना असें म्हणतात; पण शहाणपणाचा विटाळ ज्यांना झाला नाहीं त्यांना मार कशाचा कोणाला ठाऊक ! निरंकुश सरकारच्या कच्छपीं जो लागला नाहीं, अशा सरकारच्या तोंडाकडे बघून जो चाल नाहीं त्याला कुत्रासुद्धां भीक घालीत नाहीं, अशा राज्यांत विद्वान् आपल्या विद्वत्तेचा उपयोग राज्यकर्त्यांना खूष करण्याकडे करतात, असा सिद्धांत इतिहासकारांनीच लिहून ठेवला आहे. राजद्रोह हा गुन्हा ठरला तर देशद्रोहाला संमाननीयता प्राप्त होते. ह्यामुळे ढोंगीपणा वाढतो. टिळक मेल्यानंतर ज्यांनीं त्यांना मोठेपणाचें अनाहूत सरटिफिकीट दिलें त्यांनीच त्यांना खोटें बोलणारे, खोटे दस्तऐवज करणारे, दरोडेखोर, . असें ठरवलें ह्यांत कांहींच विसंगति नाहीं काय ? मोठा असेल तो खोटें कर्म कसें करील ? आणि खोदें कर्म करणारा मोठा कसा ठरेल ? पण अशा छद्मी माणसांचाच निरंकुश सत्ता पोशिंदी असते. सारांश, कांहीं अंशी वरील कारणांनी सद्यः कालीन समाज अनीतिमान्, दुःशीलवान्, कर्तृत्वहीन, भेकड असा बनला आहे. सद्गुणांची किंमत जेथें नाहीं तेथें सद्गुणांची वाढ कशी व्हावी ?
 पूर्वकालीन समाजापेक्षां विद्यमान समाज नीतिदृष्टया श्रेष्ठतर आहे, असें कित्येक म्हणतात, पण तो त्यांचा भ्रम आहे. अनाथ, अशिक्षित, विधवा बहिणीला ज्यानें फसवलें नाहीं असा एकादा तरी भाऊ कोणाच्या आढळ- ण्यांत आहे काय ? “अङ्कमारुत्य सुप्तं हि हत्वा किं नाम पौरुषम् ”. पण असें जवान फार. अज्ञानाची मिळकत हाती लागल्यावर ती तशीच्यातशीच तो सज्ञान झाल्यावर त्याला परत देणारे प्रामाणिक विद्वान् किती निघतील ?

८६