पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सडका समाज.

अशा सत्तेपासून कांहींहि लभ्यांश होत नाहीं. व शांततासुख हाहि अप्र- त्यक्ष फायदा आहे, प्रत्यक्ष नव्हे, हें ध्यानांत ठेवण्यासारखेंच आहे. प्रत्यक्ष फायदा असा एकहि सांगतां येणार नाहीं. नोकरीकरतां लोक पाहिजेत म्हणून थोडें बहुत कारकुनी शिक्षण लोकांना देणे भाग पडतें, व ह्या पोटभरी शिक्षणांतूनच तडफदार माणसे अधिक शिक्षण प्राप्त करून घेतात. पण शिक्षणाकरितां शिक्षण दिलें जात नाहीं; शांततेकरितां शांतता राखली जात नाहीं; लोकांच्या सुखाकरितां विमानें आकाशांत उडत नाहीत; राष्ट्रांतील उद्योगधंदे वाढविण्याकरतां आगगाड्या रस्त्यावरून धांवत नाहींत. त्यांचा उद्देश निराळाच असतो. अगदी आपले स्वतःचें नडेल तितकें पाहावयाचें अशी राज्यकर्त्यांची वृत्ति असते आणि ती स्वाभाविक आहे. दुर्गुण, दुर्गुणी जन व अपात्र माणसें ह्यांना मात्र वेवंद सत्ता माशाला ज्याप्रमाणे जल त्याप्रमाणे होते. राजहित व लोक- हित ह्यांत जितकें मोठें मैदान पडेल त्या मानाने वरील प्रकार कमजास्त घडून येतात. त्यांत राज्यकर्ते विधर्मी व विदेशी असले तर अनिवार्य असे अनिष्ट परिमाण झाल्यावांचून रहात नाहींत. हल्लींच पहाना, इंग्रजी ज्याला उत्कृष्ट बोलतां येत नाहीं त्याला फुटक्या कवडीचीहि किंमत कोणी देत नाहीं पण इंग्रजी चुरचुर बोलणाऱ्या अर्धवटांना उच्चस्थान पटकावतां येतें; नादान माणसें सूत्रचालक होतात. विश्वविद्यालयाकडेच पहाना; त्यांना राष्ट्रांत विद्वान कोण आहेत ह्याची वार्ता देखील नाहीं. कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित ह्यांचें नांव तरी विश्वविद्यालयाच्या प्रचंड विद्वानांना ऐकून माहीत आहे काय ? रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे हिंदुस्थानांत जन्मले हैं त्यांचें कमनशीब नव्हे तर काय ? ज्यांच्यावर आमच्या विश्वविद्यालयाच्या एल्. एल्. डी. पदवीचा मुकुट चढवला ते राजवाड्यांच्या पासंगाला तरी पुरतील काय ? नुसत्या कर्तबगारीची जर किंमत असती तर कोणत्याहि प्रजाहितरत सरकारला अथवा देशी

८५