पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सडका समाज.

नुष्य स्वभावतःच सज्जन आहे, अथवा दुर्जन आहे, ह्याविषयों पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांत मतभेद आहे. कोणी तो सज्जन आहे असें प्रतिपादतात, तर दुसरे तो दुर्जनच निपजलेला आहे असा सिद्धांत मांडतात. पुनर्जन्म न मानणारांत असा विचारभेद असणें अपरिहार्य आहे. हिंदुतत्त्वज्ञानाप्रमाणें कांहीं माणसें जन्मतःच चांगलीं असतील आणि कांहीं वाईट असतील. हा विषय उपेक्षणीय नाहीं. त्याचें फार महत्व आहे. मनुष्यप्राणी परमेश्वरानें सुजन असाच निर्माण केला आहे असें मानलें, तर सरकारावर किंवा समाजावर, मनुष्याची सुधारणा होईल अशा संस्था राष्ट्रांत स्थापन करण्याची जबाबदारी पडत नाहीं. सज्जनाला दुर्जन कर- णाऱ्या संस्था नसल्या म्हणजे झालें. पण उलट पक्षीं, परमेश्वरानें येथून तेथून सर्व सृष्टि जर नरापसदांचीच निर्माण केली असेल, तर मूल उप- जल्यापासून त्याला शुद्ध वातावरणांत ठेवण्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न समा- जाला करणें माग आहे. परमेश्वरापाशी झगडण्याची ही महत्त्वाकांक्षा अल्पबुद्धि मनुष्यप्राण्याला अभिमानास्पद नाहीं, असें कोणी म्हणावें ? असो. तत्त्ववेत्त्यांच्या ह्या वादांत सत्यपक्ष कोणता ह्याचा निर्णय बाजूस सारला, तरी राष्ट्रांतील संस्थांचे समाजावर इष्टानिष्ट परिणाम होतात, ह्यांत तिळमात्र संशय नाहीं. आणि संस्था अस्तित्वांत आणणें ही बाब प्रायः सरकारच्या हातांतली असल्यामुळे, प्रजेला चांगलेवाईट वळण लावण्याचें पापपुण्य सरकारच्या माथीं बसणें साहजिक आहे. ह्या दृष्टीनें "It is Government which makes men what they are" हें माँटेस्क्यूचें म्हणणें सयुक्तिक ठरतें, व " राजा कालस्य कारणं हें वचन वरील माँटेस्क्यूसाहेबांच्या उक्तीशीं तंतोतंत जुळतें.

८३