पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

आहे. पूर्वीचा एकसूत्रीपणा आतां राहिला नाही. त्यामुळेहि फाजील खर्च करावा लागतो. बापाचा बापपणा मुलांनी केव्हांच झुगारून दिला - आहे. मूर्ख अशिक्षित वायकांनी आपला पगडा नवऱ्यांवर बसविला आहे. अशा परिस्थितीत खर्चाला शंभर तोंडें फुटावीं हें स्वाभाविक आहे. लग्नमुंजीत आम्ही आडीच्यादिडी खर्च करतों, ह्यांतलें इंगित तरी हेंच आहे. पुण्यांत एक लग्न तरी जिलबीवांचून झाल्याचे कोणाच्या ऐकि- वांत आहे काय ? पुण्यांतील सर्वच लोक जिलबी-श्रीमंत आहेत असेंच कां समजावयाचें ? पण प्रत्येक ठिकाणी आम्हांला मनाचा कमकुवतपणा नडत असतो. लग्नांतील थाटमाट थोडा तरी क्षम्य म्हणतां येईल, पण मुंजीमध्ये त्याची जरूरी काय ? तो निवळ धार्मिक संस्कार आहे. कोण- त्याहि मुंजीला पंचवीस रुपयांहून जास्त खर्च करणें पाप होय. जेवणाव- ळीचे दिवस गेले. “ सांगतासिद्धयर्थ " ब्राह्मणभोजन पाहिजे तर करावें. पण एकदमच सर्व ब्राह्मणांना अन्नसंतर्पण केलें पाहिजे असें थोडेच आहे ? गरीब विद्यार्थी दररोज पंक्तीस घेऊन संकल्पित संख्या पुरी करतां येईल. शिवाय इतर अनेक धार्मिक कृत्ये आपण हिरण्यद्वारा करतों, मग ब्राह्मणभोजनासाठींहि आपण त्याच मार्गाचा अवलंब कां करूं नये ? सारांश, जरूर तेथेंच दिडकी खर्च करावी. अन्यत्र केली असतां त्याची महापातकांत गणना झाली पाहिजे. उधळपट्टीची राहणी तर मनुष्यत्वाचा -हास करते. ह्या गोष्टीचा विचार आमची तरुण मंडळी करील काय ? “तच्चित्रं यदि निर्धनोऽपि पुरुषः पापं न कुर्यात् क्वचित् " ह्या सुभाषितांतील संभवनीयतेकडे लक्ष देऊन तरी सधन होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा.





८२