पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उधळें युग.

नासपाऊणशे वर्षांपूर्वीचा समाज व आजचा समाज ह्यांची विहंग- मदृष्टीनें तुलना करणाराला सुद्धां कळून चुकतें कीं, पूर्वीची पिढी मितव्ययी असून आजची पिढी अतिव्ययी आहे. अर्वाचीन समाजाला पैशाची महती यथातथाच समजते. पांढरपेशा मध्यम स्थितीतील गृह- स्थांच्या घरांची झडती घेतली, तर पन्नास रुपेरी राजे ज्यांच्या घरांत हातीं लागतील असे कुबेराचे लाल किती निघतील ? द्रव्यसंचयाकडे चालू पिढीची प्रवृत्ति दिसून येत नाहीं. आदा आणि खर्च ह्यांमध्ये कोठेंहि योग्य प्रमाण राखलें जात नाहीं. आद्याची गति स्तभित, मंद व शनैः शनैः अशी असते, तर खर्चाची अनियंत्रित, शीघ्र व वेअटक असते. यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व ओढगस्त असतात. पैसा ही प्रचंड शक्ति आहे, ही गोष्ट आम्ही सध्यां विसरलो आहों. ही शक्ति जितकी त्या पैशांत असते, तितकी जिंदगींत नसते. याकरितां रोकड शिल्लक बाळगून असणें अगत्याचें आहे. " धनमूलं हि प्रभुत्वं " ही म्हण प्रत्य- कानें सोन्याच्या अक्षरांत हृत्पटलावर लिहून ठेवावी. सगळी सोंगें येतात, पण पैशाचें सोंग येत नाहीं. पैशामुळे सर्व जग वश करून घेतां येतें. अशा या पैशाचा अतिव्यय, अपव्यय वगैरे करणें हें मूढपणाचें लक्षण होय. निर्धनावर मध्याची कळा येते. निर्धन आणि मृत ह्यांच्यामध्ये वस्तुतः कांहीं अंतर नाहीं. तरी पण हल्ली दिवाळे वाजवणें हा एक शिष्टांचा आचार होऊन राहिला आहे. उधळेपणाचें बाळकडू लहानपणा- पासून मिळत असल्यामुळे असल्या गोष्टींची दिक्कत वाटेनाशी झाली आहे. लग्नादि कार्यांत बडेपणाच्या मोहाला बळी पडून फाजील खर्च