पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
एकत्र कुटुंबाचे दिवस भरले.

कत्र कुटुंब हैं मिताक्षरी हिंदूंचे वैशिष्ट्य आहे. जगांत अन्यत्र कोठेंहिं अशा तऱ्हेची संस्था आढळणार नाहीं. नवराबायको व मुलें एवढ्या समूहालाच इतरत्र कुटुंब ही संज्ञा लाविली जाते. विवाहित भाऊ अगर चुलत भाऊ एकत्र राहतात तेव्हां सुद्धां त्यांचे कुटुंब मानण्याची रूढि हिंदु लोकांतच आहे. वैदिक वाङ्मयांत कुटुंब हा शब्द प्रायः आढळत नाहीं. आणि मनुस्मृतींत जरी तो असला तरी ह्या शब्दाचा विशेषसा उपयोग अर्वाचीन संस्कृतांतच केलेला आढळतो. कुटुंबाच्या पूर्वी गोत्र शब्द वापरण्यांत असे. कुटुंब शब्द मूळचा संस्कृत तरी असेल कां ? शब्द कोठूनहि आलेला असो. समाजाचा घटक त्या नात्यानें कुटुंबाचें महत्त्व समाजशास्त्रज्ञांना फार वाटतें. सध्यां समाजाचें घटकत्व व्यक्तीवर येऊन वसलें आहे. त्यामुळे त्या दोन कल्पनांना अनुरूप अशा घडामोडी समाजांत होणें अपरिहार्य आहे. समाजरचना व्यक्तीवर झाल्यामुळें व्यक्तीचें प्रस्थ वाढत चाललें. स्त्रीस्वातंत्र्याला उत्तेजन मिळालें. उलट समाजाचा प्रारंभ कुटुंबापासून केला म्हणजे कुटुंबांतील व्यक्तींचा कुटुंबांत पूर्णांश नें लय होतो. पुरुषहि स्वातंत्र्यविहीन बनतात; मग स्त्रीस्वातंत्र्याची गोष्टच बोलावयास नको. कुटुंबसंस्थेत सर्व व्यक्तींना आत्मसंयमनाचें वळण लागतें, तर व्यक्तिमूलक समाजांत आत्मप्रचोदनाला ऊत येतो. सध्यां प्राचीन कुटुंब- संस्था नष्ट झाल्यासारखीच आहे. हिंदुस्थानांत सुद्धां विवाहितांची जितकी संख्या आहे तितकीच घरांची आहे असें शिरगणतीवरून दिसतें. ह्या वरून भावांचीं कुटुंबें बनत नाहींत असेंच सिद्ध होतें. विभक्त होण्याला भाऊ बापाच्या मरणाचीच वाट पाहत असतात.

६८