पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

अस्तित्वांत आली तरी हरकत नाहीं. हा मंत्रोच्चार प्रत्येकाने केलाच पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. ह्या शिष्ट समजुतींच्या विरुद्ध ब्र काढील त्याच्याकरतां वेड्यांच्या गृहाचें द्वार ताबडतोब उघडलें जाईल. सारांश आपणांस सध्यां स्वातंत्र्य आहे असें वाटतें तो नुसता भ्रम आहे. जें नाणें प्रचारांत असतें तें जसें आपण वापरतों तसेंच विचारांचें आहे. संभा- चितांची मतें आपण ग्रहण करून त्यांवर आपला वाङ्मय व्यवहार यथास्थित चालवतों. ही झाली विचार न करणारांची स्थिति; विचार करणारांना हे विचारचलन अभिमत नसले तरी त्याचा स्वीकार करावा लागतोच. नाहीं तर सर्व व्यवहारच बंद होतो. स्त्रियांना कौंसिलमध्ये बसण्याचा अधिकार द्यावा असा ठराव मांडणाराला विरोध करून गांव- ढळपणाचे प्रदर्शन करण्यास कोण धजावणार? विद्याहीन माणसांना कारकुनाच्या नोकऱ्या देण्याचे ठराव एकमतानें पास नाहीं का होत ? स्वातंत्र्याच्या वावदूकत्वाचे हे दिवस आहेत. पण बहुतेक प्राणी बऱ्याच बाबतीत परतंत्र आहेत असाच विचारांती सिद्धांत बनतो. आपलें स्वरूप आपल्या ताव्यांत नाहीं, आपला जन्म आपल्या आटोक्याच्या बाहेर. मग स्वतंत्र अशी एक तरी बाब आहे काय ? आपण जो पोषाख करतो तो तरी आपण आपल्या निवडीनें करतो काय ? आपले पूर्वज, आपलें जातगोत, आपले शेजारी, ह्यांनी जी तन्हा घालून दिली तीच आपण अनुसरीत नाहीं काय ? आपल्या आईबापांचीच भाषा आपण उचलतोंना ? प्रत्ये- काला आपल्या धर्माचा अभिमान असतो तें स्वतंत्र विचाराचें फल म्हणणे शक्य आहे काय ? उपजतांच जो धर्म आपणांस आढळला त्यालाच आपण चिकटून राहतो. एवंच आचार, विचार, धर्म, भाषा, पोषाख इत्यादि किती तरी गोष्टींत पारतंत्र्याच्या महाशिलेखालीं आपण दड- पलों आहों. विचारवंत युरोपिअन डोक्यावर आपली साहेबी टोपी टाकून ब्राह्मणी पागोटें कां घालीत नाहीं ? मारवाड्याचें पागोटें पारशाच्या