पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

आतां वैवाहिक सुखोत्पादनाला सुशिक्षित स्त्री अपरिहार्य असल्यामुळे लग्नाचा काल वाढविणें रास्त आहे. आठ वर्षांच्या मुलीचें लग्न करणें तत्वतः कितीहि शहाणपणाचें असले तरी आजच्या समाजाला पूर्व- स्थितीवर जाणें शक्य नाहीं. करतां आठाच्या जागीं अठराची मर्यादा घालणें क्रमप्राप्त आहे. ह्या वयापर्यंत वर सांगितल्याप्रमाणे मुलाचें शिक्षण पूर्ण करतां आलें पाहिजे. मुलाचेंहि तेविसाव्या वर्षांपर्यंत लग्न होऊं नये ही वयोमर्यादा शिक्षणाकरतां अवश्य आहे.
 गृहव्यवस्थेचीं सर्व अंगें स्त्रियांनी आपल्या शिरावर घ्यावीं हें उचित होय व पुरुषांनीहि त्यांच्यावर तीं सोंपविणें जरूर आहे. मनूनेंसुद्धां असाच पोक्त सल्ला दिला आहे. तो म्हणतो " अर्थस्य संग्रहे चैनां व्यये चैव नियोजत् । शौचे धर्मेऽन्नपक्त्यां च परिणाह्यस्य वेक्षणे " पतीनें मिळ विलेला पैसा राखणे; खर्च करणें; गृह स्वच्छ ठेवणे; धार्मिक कृत्यांविषयीं दक्षता बाळगणे; स्वयंपाक करणे आणि घरांतील चीजवस्तूंवर लक्ष्य ठेवणें, ह्रीं कामें पुरुषाच्या मदतीशिवाय स्त्रियांनीं केली पाहिजेत. शिवाय मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा बोजाहि सर्वस्वी स्त्रियांनीच उचलला पाहिजे. ह्यांपैकी एकहि काम सध्यां स्त्रियांकडून केले जात नाहीं. “ पत्नी- मूलं गृहं पुंसां ” ( दक्षस्मृति ), गृह हैं पत्नीमूलक आहे, हें लक्षांत ठेवावे. पत्नी ही गृहस्वामिनी होय. पण आपल्या घरांत काय आहे हें एका तरी बायकोला हल्लीं सांगतां येईल काय ? घरांतील कामचलाऊ व शिलकी सामानाची यादी एखाद्या स्त्रीने करून ठेवल्याचे कोणास माहीत आहे काय ? एकातरी कुटुंबामध्ये बजेट करण्याची रीत आढ- ळेल काय ? संसार चालविणें म्हणजे छोटेसें राज्य चालविणें होय. पण ह्याची कल्पनाहि हल्लींच्या स्त्रियांना नाहीं. घरांत कोठेंहि सुव्यवस्थितपणा दिसावयाचा नाहीं. उलट सण घुगऱ्या व अवदिशीं पुया असाच अनु- भव प्रायः सर्वत्र येण्यासारखा आहे.

४६