पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

देखावा दिसावा हें खचित विस्मयावह आहे. वास्तविक पाहिले तर अनियंत्रित सत्तेच्या युगांत हक्काचा दिमाख चालावा. पण कदाचित् असेंहि असूं शकेल कीं, एका मोठ्या हक्काच्या खालीं बाकीचे हक्क चिर- डून जातात. उलट लोकशाहीत घोडहक्कांचें मर्दन झाल्यामुळे चिमुकले हक डोके वर काढतात, हाच तर्क खरा असावा. कारण सांप्रत सर्वत्र हक्कांची चकमक झडत असलेली पाहण्यांत येते. त्यामुळें चालू युगाला कलि-अथवा कलह-युग म्हणण्यांत औचित्यच आहे. समाजाची उभा- रणी हक्कावर करण्यांत येत आहे. पण हा प्रयत्न अपेशी झाल्यावांचून राहणार नाहीं. हक्काची मुहूर्तमेढ रोवलेल्या समाजांत प्रत्येकाला शस्त्र- पाणि असावें लागतें. अशा समाजांत व्यक्तीला सुखोपलब्धि कशी व्हावी ? हक्क म्हणजे दुसऱ्याला ज्याच्यापुढें मान वांकविली पाहिजे, ज्याच्या- पुढें दुसऱ्याचें कांहीं चालावयाचें नाहीं असा एखादें कृत्य करण्याचा अधिकार अथवा दुसऱ्याला एखादें कृत्य ज्याच्यायोगानें करतां येणार नाहीं असा आपले ठिकाणी असलेला अधिकार. ही नवीन कल्पना सध्यां लोकाचाराच्या न्याय्यान्याय्यत्वाची कसोटी बनूं पहात आहे. ही कल्पना मायावी, अतएव मोहक, पण सुखाला मात्र दूर दूर सारणारी आहे. ही कल्पना हल्ली हक ह्या शब्दानें व्यक्त केली जाते. पण हक्क शब्दाचा हा कांहीं मूळचा अर्थ नव्हे. मनुष्यप्राणी हक्क घेऊन जन्मास आला नाहीं. ऋण घेऊन आला आहे.
 हक्क हा शब्द संस्कृत किंवा मराठी नसून अरबी आहे. ह्या शब्दाचा प्रतिवाचक शब्द उभ्या संस्कृतमराठींत आढळत नाहीं. आमच्या प्राचीन विद्वानांच्या मतें समाजघटना धर्मावर म्हणजे कर्तव्यावर झाली पाहिजे. प्रत्येक मनुष्याचें तो ज्या परिस्थितीत आणि अवस्थेत असेल त्या अव- स्थेला अनुसरून सहज कर्तव्य असतें. आपआपल्या धर्माप्रमाणे, कर्तव्या- प्रमार्णे प्रत्येकानें वागले पाहिजे. तेथे हक्काची बात नाहीं. प्रत्येकाच्या मागें

३६