पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

काय पुसावें ! नवराबायकोंना अर्थ आयुष्य फौजदारी कोर्टातच घालावें लागेल. एकमेकांविरुद्ध हक असलेल्या दोन व्यक्ति गुण्यागोविंदानें एकत्र नांदणें अशक्य आहे. नवराबायको म्हणजे कांहीं जॉईंट स्टॉक कंपनी नव्हे. एकमेकांच्या गळ्यांत माळ घातलेल्या स्त्रीपुरुषांना समस- मान हक्क आहेत असें मानणें म्हणजे त्या दोन व्यक्ति स्वतंत्र व अलग करणें होय. आतां पुराणमतवादी अशा स्त्रीपुरुषांचे तादात्म्य मानतात.हे तादात्म्य पृथक्त्वापेक्षां अधिक श्रेयस्कर नाहीं काय ? तादात्म्यांत स्वतंत्र हक्कांना जागा कोठे आहे ? ' शिवस्य हृदयं विष्णुः विष्णोश्च हृदयं शिवः' ही स्थिति स्त्रीपुरुषांच्या संबंधानें असली पाहिजे. स्त्रीपुरुष एक- जीव होणें ही कल्पना उदात्त आहे, पण उदात्त असो वा अनुदात्त असो, उपयुक्त व सुखपर्यवसायी आहे ह्यांत संदेह नाहीं. हक्क आले म्हणजे हक्कांचें अतिक्रमणहि होणारच. आणि अतिक्रमण झालें कीं वाद उत्पन्न झालाच. अशा स्थितीत विवाहित स्त्रीपुरुष सुखी राहतील ही अपेक्षा कोणी करावी ? स्त्रीपुरुषांचें परस्परांवर इतकें प्रेम असतें कीं, त्या प्रेमाला अतिरेक हा ठाऊकच नसतो. अशा प्रेमवद्ध, अगर प्रेमांध जोडप्याला आपआपल्या परस्परविरोधी हक्कांविषयीं जागृत रहा असा इशारा देणें हें वावळेपणाचे व अरसिकतेचें द्योतक होय. आतां एकजीव होणें ह्याचा अर्थ काय ? दोन निरनिराळी शरीरें विवाहरूपी जादूच्या कांडीनें एकत्र होतात, दोन शरीरांचें एक शरीर बनतें असें थोडेंच आहे. तेव्हां दोघांचे हितसंबंध एक असणें म्हणजेच एकजीव होणें होय. पण दोघांची मालमत्ता निरनिराळी असली तर हितसंबंधहि निरनिराळे होणार. मग शरीर निराळें, विचार निराळे आणि हितसंबंधहि निराळे. अशा ह्या दोन विचित्र व्यक्तींचें ऐक्य राहील काय ? सारांश विवाहावस्थेत म्हणजे निदान पति जीवंत आहे तोपर्यंत तरी स्त्रीला पृथक् हक्क देण्याच्या वल्गना करणें बालिशपणाचें आहे.

३४