पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गृहिणी गृहमुच्यते.

स्त्रीत्यांना पुरुषी शिक्षण दिल्यानें विवाहाचा फांस आपल्या माने- भोंवती लावून न घेण्याकडे त्यांच्या मनाचा कल होतो. अविवाहित म्हणजे पुरुष स्त्रिया. अविवाहित राहून स्त्रिया पुरुषसंख्येत भर घाल- तात. जगाला आरंभ असेल तर आपणांस अनुभवावरून असें म्हणतां येतें कीं, आदिकालापासून आजवर सर्व पृथ्वीवर परमेश्वर स्त्री व पुरुष यांस समप्रमाणांत जन्मास घालतो. म्हणजे एका पुरुषाला एक स्त्री असावी असा परमेश्वरी हेतु दिसतो. आतां अविवाहित स्त्रियांनीं आपणांस जर पुरुषजमा करून घेतलें तर निसर्गप्रमाण चळते. पुरुषांवरहि अवि- वाहित राहण्याचा प्रसंग येणार. स्त्री व पुरुष मिळून एक घटक अशी मूळची परमेश्वरी योजना. पण स्त्रिया पुरुष बनल्याने पुरुषाचें तसेंच स्त्रीचें मनुष्यत्व विकल होतें. स्त्री-पुरुषांच्या व त्यांच्याबरोवर समा- जाच्या उन्नतीला अथवा उत्कर्षाला विवाह मुख्यत्वेकरून कारणीभूत होतो. परंतु अविवाहित अतएव अपूर्ण अशा पुरुषाकडून अगर स्त्रीक- डून समाजहित कसें साधणार ? आतां पुरुषी शिक्षण घेतलेल्या स्त्रिया विवाहबद्ध होतात अशी कल्पना केली तरी त्यांच्यामध्यें संसार चालव- ण्याची किंवा बालसंगोपन करण्याची पात्रता त्या शिक्षणानें येतें असें कसें म्हणतां येईल? बुद्धि प्रगल्भ होईल, बहुश्रुतपणा उत्पन्न होईल, तसेंच मनुष्यस्वभावाचें ज्ञान होईल, पण इतक्यानें संसारशिक्षणाची पूर्तता होणार नाहीं. पुरुषी शिक्षणांत आयुष्य वाया जाऊन आवश्यक शिक्षणाच्या अभावी संसाराचा गाडा रेंगाळत चालला तर त्यांत नवल तें काय ?
३२