पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्त्रियांचें पुंसीकरण.

विवाहवाहगत आवश्यक धार्मिक कर्माचा खल केल्यानंतर वैवाहिक सुखाकडे आमच्या भाषाणाचा ओघ स्वभावतः वळला. स्त्रीपुरुषांना संसारसुख अधिकांत अधिक कोणत्या उपायांनीं प्राप्त होईल हा आमच्या गप्पांचा आतां विषय झाला. सर्व जगांत प्रस्तुतकाली हा अत्यंत मह- त्वाचा विषय होऊन बसला आहे. समाजघटना झपाट्याने बदलत आहे. पूर्वीची बसलेली घडी सध्यां उलगडत चालली आहे. प्रत्येक रूढी क्रांतीच्या जळजळीत तव्यावर पडून द्रवीभवनाच्या मार्गाला लागली. आहे. आणि ह्या सर्वाला कारण स्त्री आहे. पुरुष पूर्वी होता तसाच सध्यांहि आहे. पण स्त्रीचें मात्र पुरुषीकरण होऊ पहात आहे. आपण पुरुष व्हावें अशी उत्कंठा त्यांस लागून राहिली आहे. “ तस्मात्सर्वं परि- त्यज्य पतिमेकं भजेत्सती ” असलें सतीत्व स्त्रियांस मानेनासें झालें आहे. पुरुषांप्रमाणे स्त्रियांस जगांत अप्रतिहत वावर करावयास पाहिजे आहे. सारांश, पुरुष जरी अद्यापि पुरुषच राहिला असला तरी स्त्री स्त्री राहिली नाहीं. संसार हा स्त्रीपुरुषांचा आहे. पुरुष-पुरुषांचा नाहीं. तेव्हां पुरुष व पुरुषी स्त्रिया ह्यांचा संसार विघटित झाल्यास आश्चर्य तें काय ? स्त्रीपुरुषवादाला. समान हक्काचा लढा असें स्वरूप देण्यांत येतें. परंतु हेंहि ह्या वादाचें यथार्थ वर्णन नाहीं. आजपर्यत कुटुंबांत अथवा समाजांत पुरुषांचें जें स्थान होतें तें स्थान पटकावण्याची हांव स्त्रियांनीं धरली आहे. कुटुंबाचा मेढा पुरुष आहे ती स्त्री कां नसावी ? जगांत सर्वत्र पुरुषांचाच गाजावाजा चालला आहे, स्त्रियांचा कां नसावा ? अनेकविध धाडसी धंद्यांत पडून पुरुष नांव मिळवितात. स्त्रियांनाहि तसें कां करतां येऊं नये? विवाहोत्तर

२०