पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२ पढतमूर्खाचे आचार.

तारुपालसित प्रेम हें बाह्योपाधींवर अवलंबून असल्यामुळे कोणत्या उपाधींनी वधूवरांच्या प्रेमाचा अगर सात्त्विक आसक्तीचा परिपोष होईल हें जाणण्याची शक्ति अजाण व अल्लड तरुणांपेक्षां त्यांच्या अनुभवी, प्रौड, प्रजाहितदक्ष व विवेकी मातापितरांनाच अधिक असली पाहिजे. ह्या दृष्टीनें विचार करतां मुलानें आपली वधू पसंत करण्यांत पाश्चात्यांचे खुळ- चट अनुकरण आमच्याकडून जें करण्यांत येतें तें आमच्या विवेकहीनतेचें निदर्शक होय. धर्म, अर्थ आणि तीन पुरुषार्थ विवाहानें साधा- वयाचे असतात. नुसत्या विषयोपभोगाकरितां विवाहसंस्था अस्तित्वांत आली नाहीं. कामसंतर्पण हाच जर लग्न करण्याचा ऐकांतिक हेतु असता तर त्याला विवाहसंस्थेची आवश्यकता मुळींच नव्हती. कामाकडे भूत- मालांची स्वयमेव प्रवृत्ति असते. पण ह्या पाशवीवृत्तीला नियंत्रित करणें, सन्मार्गाला लावणें आणि ती सात्विक सुखप्रसू होईल असें करणें हाच विवाहाचा उच्चतर हेतु होय. हा हेतु सफल करतां येईल अशी तयारी विद्यार्थ्यांची मनानें, शिक्षणानें आणि अनुभवानें झालेली नसते. त्यामुळे मुलांनी मुलगी पाहण्याची चाल विशेष समंजसपणाची आहे असें म्हणतां यावयाचें नाहीं. बाकीच्या गोष्टी तर राहोत, पण मुलांना सात्त्विक व सहज सौंदर्य म्हणजे काय याची जाणीवहि नसते. चट्टीपट्टी करून दिखाऊ पोषाखांत आणि आकर्षक स्वरूपांत सिनेमांतल्या पडद्या- वरील चित्राप्रमाणे क्षणभर दृष्टीसमोर येऊन जाणारी मुलगी चतुर्भुज होण्यास आतुर झालेल्या मुलावर दुसरा कोणता परिणाम करणार ?