पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

नहीं हैं युक्तच आहे. प्रेम की भक्ति ह्या प्रश्नाला भक्तिं हेंच उत्तर आम- च्या इकडील विद्वानांनी ठरवून ठेवलें आहे. सीतेचें रामावर प्रेम नव्हतें. तिची आपल्या पतीच्या ठिकाणी एकनिष्ठ भक्ति होती. तेव्हां आमच्या तरुणांनीं प्रेम ह्या पोकळ शब्दाला भुलून कुकल्पनांचें वारें आपल्या मनांत शिरूं देऊं नये. वस्तुतः पाहतां परमेश्वराचें आपल्या भक्तावरील प्रेम, मातेचें तनुजप्रेम आणि रमणरमणीप्रेम ह्यांमध्ये मूलतः भेद आहे. हे तीन मनोभाव प्रदर्शित करण्यास भाषेमध्यें निरनिराळे शब्द असूं नयेत ही चमत्कारिक, तशीच दुःखाची गोष्ट होय. पतिपत्नीभावाचें पावित्र्य सुरतशास्त्रांतील प्रेम शब्दानें डागाळणे चांगलें नाहीं. 'स प्रेमा भेदरहितं नोर्यद्भावबंधनम्' ही कामशास्त्राची प्रेम ह्याची व्याख्या 'कुट्टनीमतम् ' नामक ग्रंथांत दिली आहे. ह्या व्याख्येप्रमाणे प्रेम हें तारुण्यावरच तरतें. पण पतिपत्नीसंबंध तारुण्यव्यतिरिक्त अवस्थेंतहि कायम असतो. तसेंच या रतिप्रेमांत अभेदबुद्धि असते; पण भक्ति भेदभाव सुचविते. देवासमान पति मानल्यावर भक्तिशब्दानें पतिपत्नीचें नातें शब्दित करणें उचित होय. नवविधा भक्तींत आत्मनिवेदन ही अखेरची भक्ति सांगितली आहे, व “ भक्त म्हणजे विभक्त नव्हे " असें रामदासस्वामींनीहि म्हटलें आहे, ही गोष्ट खरी. तथापि ज्ञान्यांच्या अद्वैतासेद्धांताहून भक्तियोग कमी योग्यतेचा नाहीं. हें सिद्ध करण्याच्या लालसेनेंच ही नववी भक्ति पूर्वीच्या आठांत सामील झाली. यौवनजन्य प्रेमाचा यौवनावरोवर -हास झाला म्हणजे प्रत्येक नवरा-बायकोनें काडी मोडून दूर व्हावें कीं काय ?