पान:गच्चीवरील गप्पा.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उद्घाटन.

कळकळीनें प्रवासाची दगदग सोसतात हीच त्यांच्या नीतिअनीतीची कसोटी होय. निस्पृह, निरभिमानी, शहाणे, कुशल असे पुढारी हिंदुस्थानाला एकाच वेळी एकाहून अधिक आजपर्यंत मिळाले नाहींत, ह्यावरूनच आमच्या समाजाची अवनति ताडतां येईल. हा नैतिक अधःपात दारिद्र्याचें फळ होय. पण सभोंवार घनघोर दारिद्र्य असतां उधळेपणाचें व्यसन आम्हाला जडलें आहे असा अभिप्राय ह्या गप्पांमध्यें प्रदर्शित केला आहे. मुलांना आम्ही लहानपणापासून चैनीचें बाळकडू पाजतो हा सर्वस्वी आमचा दोष आहे. कॉलेजच्या वसतिगृहांत राहून मुलें खुशालचंद, गाफील, नादान, मूढ बनतात. ह्याचें सर्व पाप कालेजच्या देवतांकडे आहे. मुलां- वर देखरेख नाहीं. अभ्यास करणाऱ्या मुलाला स्कॉलरशिप ठेवण्या- पेक्षां मुलांना शिस्त लावणाऱ्या रेक्टरला स्कॉलरशिप कोणी उदारधीनें ठेवली तर त्याचे देशावर फार उपकार होतील. पूर्वीची समजूत अशीं कीं, लहानपणीं कष्ट सोसले म्हणजे मध्यमवयांत कोणतेंहि काम करण्यास मनुष्य पात्र होतो. पण हल्लीं सर्व पाहावें तो उरफाटें. लहानपणापासून मातबरीचें वळण ज्यांना लागले त्यांच्याकडून पराक्रम पुढे काय होणार हें दिसतेंच आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्ण विद्यार्जनार्थ गुरूच्या घरीं गरीबी स्थितीत राहिले ह्याचें महत्व आमच्या लोकांना वाटत नाहीं. हल्लींची पिढी कर्तृत्वहीन होणें हें त्यांच्या कॉलेजमधील राहणीचें फल होय. पूर्वीच्या पिढींतला करारीपणा, उद्योगशीलता, काटकपणा, इत्यादि गुण चालू पिढींत फारसे आढळत नाहींत, ह्या दुर्गुणांचें खापर कॉलेजच्या अधिकाऱ्यांच्या माथी फोडण्यांत कांहीं दोष लागणार नाहीं. ब्राह्मणांच्या मुलांना चैनीच्या सवयी लागल्यानें ब्राह्मणसमाजाचा -हास होत आहे. ब्राह्मणांनीं इतःपर कॉलेज शिक्षण घेऊ नये आणि वसतिगृहांत तर राहूच नये. शिक्षणानें कांहीं मोक्ष मिळत नाहीं. नोकरी मिळावयाची तोहि आतां बंद झाली. मग ह्या कारकुनी शिक्षणाचा उपयोग काय ? पैशाचा

११