पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

सामान्यनियम मनूनें घालून दिला असतांहि हल्लींचें भिक्षुक सुतक वाढ- विण्यासाठी धडपड करीत असतात. देशावर संकट आलें असतां (देश- विप्लवे) अथवा कष्टप्रद स्थितींत ( आपद्यपि हि कष्टायां ), सुतकी बस - प्याचें कारण नसतां, प्लेगइन्फ्लुएंझादि सांथीत लोकांनी आशौच धरून दैवी आपत्तीत आपल्या मौर्यजन्य आपत्तीची भर पाडली ह्याला काय म्हणावें ? शिल्पी, कारु, वैद्य, नोकरचाकर, न्हावी, राजे, दानाध्ययन- शील विप्र, अग्निहोत्री इत्यादिकांस शास्त्रकारांनी सद्यः शौचच सांगितलें आहे. पण सध्यां प्रत्येकानें भरपूर आशौच धरण्यांतच धर्म आहे असें मानणाऱ्या उपजत शहाण्यांचीच संख्या समाजांत फार आहे. राजाला सुतक नाहीं ( कारण कार्यविरोधात् " ); त्याचप्रमाणें अमक्यानें, आशौच धरूं नये (यस्य चेच्छति भूमिपः ) अशी राजाची इच्छा अस- ल्यास त्यालाहि शास्त्रकाराप्रमाणे आशौचाचें बंधन नाहीं. पण हा शास्त्र- नियम किती जणांना विदित असतो बरें । दशाहांतला मनुष्य अन्य ठिकाणी ( देशांतरस्थिते ) मृत झाल्यास स्नान करून मोकळे होतां येतें. अधिक काल आशौच धरण्याचें कारण नाहीं हें ऐकून पुष्कळांना अचं- बाच वाटेल. पण तसेंच शास्त्र आहे.
 खरोखर आमचें धर्मविषयक अज्ञान कांहीं असें तसें नाहीं. धर्माच्या नांवानें आम्ही शरीराची हेळसांड करतों. पण शरीरावांचून धर्माचरण क करतां येईल आणि धर्माचरणावांचून सद्गति तरी कशी मिळणार ? पाय तोडल्यावर पोहतां येईल काय ? म्हणूनच आमच्या शास्त्रकारांनी आधी स्वास्थ्य आणि मग धर्म असा असंदिग्ध उपदेश केला आहे. आशौ- चादि धर्माचार ह्या सर्व स्वस्थकालांतील गोष्टी आहेत असें दक्षस्मृतीत सांगितलें आहे. (स्वस्थकाले त्विदं सर्वमाशौचं परिकीर्तितम् ). वैय्यक्तिक सामाजिक किंवा दैशिक पडत्या काळांत स्वस्थकालीन धर्माचरण करणें म्हणजे आपल्या हातीं आपली घटका घालण्यासारखे आहे. स्त्रियांच्या

९०