पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिवाशीव.
- (*) -

नित्यनेमाप्रमाणे आम्ही चार वाजतां गच्चीवर चहापानार्थ गेलों आणि आपआपल्या जागेवर बसलो. चहाचे पेले टेबलावर येऊन थडकले. इतक्यांत आमचा गडी टपाल घेऊन आला. आमच्यापैकी एकानें टपाल घेण्यास हात पुढें केला; पण तो गडी हातांत टपाल देईना व व टेबलावरहि ठेवीना. जमिनीवर ठेवून निघून जावें तर उद्दामपणा वाटेल; टेबलावर ठेवावें तर ब्राह्मणाच्या चहाला शिवण्याचें पातक लागेल, अशा पेंचांत तो विचारा सांपडला. परंतु ह्या प्रसंगानें त्या दिवशीं आहांला शिवाशिवीची मीमांसा करावयास लावलें. आम्ही सर्व धर्मशास्त्र पालथें घातलें; धर्मशब्दाचा कीस काढला, इतर धर्माशी हिंदुधर्माची तुलना केली व अखेरीस आमच्या उज्वल धर्माचा आमच्या लोकांनी विपर्यास केलेला पाहून आमच्या धार्मिक अज्ञानाची आम्हांस लाज वाढली; क्षणभर अवाङ्मुख होऊन बसण्याचा प्रसंग आमच्यावर आला. कारण, आचारसंपन्न शूद्राचा इतका विटाळ मानण्याचें प्रयोजन नाहीं असें शास्त्र सांगतें. आपल्या घरी ठेवलेल्या गड्याचे आचार जवळ जवळ यजमानासारखेच असतात. निदान हीनाचारी तो नसतो हे खास. तेव्हां गृह्यशूद्रांना घरांत सर्वत्र संचार करण्यास शास्त्राची आडकाठी नसते. अंथरूणपांघरुणाला लागूं नको, पाण्याला शिवूं नको, असें म्हणून मोलकरणींवर खवदळणान्या आमच्या मूढ स्त्रियांनी खालील शास्त्रवचन मुखोद्गत करण्यासारखें आहे : मूल्य कर्मकरः शूद्रदासीदासास्तथैव च । स्नाने शरीर संस्कारे गृह्यकर्मण्यदूषिताः। गृहस्वामिनीची वेणीफणी करणें, स्नानास पाणी देणें इत्यादि गृहकृत्यें मोलकरणीनें करण्यास प्रत्यवाय नाहीं. एवढेच नव्हे तर आचारसंपन्न शूद्राला श्राद्ध करण्याचा अधिकार

८८