पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९. खुली व्यवस्था आणि संप


 टपाल व तार कर्मचाऱ्यांनी नुकताच संप केला आणि सरकारला नमविले. विमा कर्मचारी आता संपावर उतरत आहेत. महाराष्ट- राज्य शासनाचे कर्मचारीही लवकरच संपावर जातील आणि पगारवाढ, बोनस, हक्काच्या सुट्ट्या इत्यादी इत्यादी ज्या काही मागण्या असतील त्या पदरात पाडून घेतील.
 सरकारी कर्मचाऱ्यांचे संप यशस्वी होतात. याउलट, खाजगी क्षेत्रातील केवळ संपच नव्हे तर सर्व कामगार चळवळच काहीशी थंडावली आहे. खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्यांना शेवटी, जमा आणि खर्च यांचा मेळ घालणे आवश्यक आहे. मजुरीवरचा खर्च वाढला आणि त्यामानाने बाजारात मिळकत होण्याची शक्यता नसली तर उद्योजकांना नोटा छापून वेळ निभावून नेण्याची काही शक्यता नसते. कारखाना बंद करणे, नोकरकपात करणे किंवा कंत्राटी मजूर लावून खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढविणे असा काहीतरी मार्ग त्यांना काढावाच लागतो. कामगार नेत्यांनी संप पुकारला म्हणजे कारखानदारांना आता दु:ख होत नाही; चिंता वाटत नाही. डॉ. दत्ता सामंत यांनी कापडगिरणी कामगारांचा संप सुरू केला तेव्हा मालक आणि व्यवस्थापक दोघांनीही आनंदोत्सव साजरा केला.

 भांडवलशाही व्यवस्थेच्या आणि कारखानदारीच्या सुरुवातीच्या काळात बाजारपेठा उभ्या राहिलेल्याच नव्हत्या, नवा कारखानदारी माल स्वस्तात स्वस्त विकण्यासाठी कारखानदारांचा खटाटोप चालत असे, त्या काळात नाममात्र वेतनावर मजुरांना राबविले जाई. अगदी दहाबारा वर्षाची मुलेही गिरण्यांत, खाणींत आरोग्यास बाधक अशा परिस्थितीत दिवसाला बाराबारा तास काम करीत. वेतन अगदी तुटपुंजे - चार ते सहा आणे रोज, जेवणाची सोय नाही, औषधाची व्यवस्था नाही, सुट्टी म्हणून नाही; मग म्हातारपणासाठी निवृत्तीवेतन वगैरे दूरच राहिले. अशा 'नाही रे' अवस्थेतील कामगारांनी निकराचे हत्यार म्हणून संपाचे साधन वापरले. कामगार संघटना मजबूत होत गेल्या. संपाच्या काळात उपासमार, पोलिसांचा लाठीहल्ला, गोळीबार, भाडोत्री गुंडांचे अत्याचार या सर्वांना समर्थपणे तोंड देत अक्षरशः रक्त, घाम आणि अश्रू यांची किंमत देऊन कामगारांनी आपली आर्थिक स्थिती

९६
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने