पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाचे वाक्य वापरले. आर्थिक सुधारांकडे अधिक वेगाने आपण का जात नाही? आणि चलनवृद्धीचा धोका घेऊनही वित्तीय तूट आटोक्यात का ठेवली नाही? याचे स्पष्टीकरण देतांना वित्तमंत्री म्हणाले, 'पूर्णतेच्या शोधात कार्यनाश दडलेला असतो.' पंडित नेहरूच्या काळापासून व्यवहारवादाचे कित्ते गिरवलेला, समाजवादी शैलीच्या समाजरचनेसाठी सेवा रुजू केलेला हा नोकरदार आता खुल्या पद्धतीची समाजरचना उभारण्यासाठी हजर झाला आहे.
 दुर्दैवाची गोष्ट ही की नेहरूपद्धतीला जन्मभर कसोशीने विरोध केलेले भले भले लोक राव-सिंग जोडीच्या हातचलाखीला आणि संमोहन विद्येला भुलले आहेत आणि काँग्रेसने टाकून दिलेल्या सरकारशाही धोरणांशी घरोबा करू पहात आहेत. सार्वजनिक क्षेत्राचे आधिपत्य, स्वावलंबनाच्या नावाखाली देशी अकार्यक्षम कारखानदारीला संरक्षण इत्यादी टाकाऊ ठरलेल्या संकल्पनांचा पुरस्कार डावे पक्ष करतात यांत काही आश्चर्य नाही. त्यांचा पिंडच मुळी 'नवीन काही शिकायचे नाही आणि जुने काही विसरायचे नाही' असा.
 पण 'असरकारी' कार्यक्रमांचा आग्रह धरणारे गांधीवादीदेखील नेहरूछापाची धोरणे चालू राहावीत असा आग्रह धरू लागले आहेत हे मोठे विनोदी दृश्य आहे.
तारेवरच्या कसरती
 खुली व्यवस्था, परिवर्तनीय रुपया, कार्यक्षम करप्रणाली यांच्याबरोबरच नोकरशहांना संरक्षण आणि पक्षाची प्रतिमा जपणे अशा चित्रविचित्र वस्तूंचे गाठोडे घेऊन मनमोहन सिंगांचा फेरीवाला देशापुढे उभा आहे. वेगवेगळ्या चिजा ग्राहकापुढे ठेवताना फेरीवाल्याप्रमाणे ते वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. मनमोहन सिंगांच्या यंदाच्या अंदाजपत्रकाची निदान तीनचार तोंडे आहेत.
फेब्रुवारी : अंतिम दिवस

 दूरदर्शनच्या प्रसारामुळे अंदाजपत्रक सादर करण्याचा दिवस म्हणजे राज्यकर्त्या पक्षाला शंभरेक कोटी रुपयांची फुकट प्रसिद्धी. अशी सुवर्णसंधी कोणताही मुत्सद्दी सत्ताधारी का म्हणून गमावेल? २८ फेब्रुवारीला सादर करायच्या अंदाजपत्रकांत कठोर असा कोणताही निर्णय जाहीर करणे म्हणजे

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
९१