पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आर्थिक धोरणांविरुद्ध आज तिरीमिरीने बोलत आहे ती धोरणे राबवण्यात, सेवेतून निवृत्त होईपर्यंत, त्यांचा स्वत:चाच मोठा हातभार लागलेला आहे. जी पातके धुण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे ती पातके काँग्रेसच्या चार दशकांच्या शासनाची आहेत याचा त्यांनी संमोहन विद्येने भारले गेल्यासारखा लोकांना विसर पाडला आहे. नेहरू-व्यवस्थेची पापे धुवून टाकतांना नेहरूंचाच जयजयकार करण्याचे त्यांचे कसब मोठे वाखणण्यासारखे आहे.
 खुल्या व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू करणे, काँग्रेस शासनाची ४० वर्षांची धोरणे उलटी फिरवणे, त्याबरोबरच मागील चुकांची किंमत पक्षाला द्यावी लागणार नाही याची काळजी घेणे अशी तारेवरची मोठी अवघड कसरत हे करीत आहेत. त्याचबरोबर नोकरदारांच्या मिराशींना धक्का लागणार नाही, संघटित कामगार नाखूष होणार नाहीत याचीही त्यांना चिंता आहे. खुली व्यवस्था असली म्हणून काय झाले? "गरीबी हटाओ" ची भाषा चालू राहिलीच पाहिजे. गरीबी हटवण्याच्या घोषणेने इंदिरा गांधीदेखील देवतासमान बनल्या. गरीबी काही कोठे कमी झाली नाही. 'गरीबी हटाओ' कार्यक्रमाचा पक्षाच्या प्रचारकामात मोठा उपयोग होतो. तेव्हा तो कार्यक्रम चालू राहिलाच पाहिजे. कल्याणकारी कार्यक्रम निरुपयोगी असतात हे सर्वसिद्ध, सर्वमान्य झाले तरी कल्याणकारी कार्यक्रम मते मिळवण्यासाठी मोठे उपयोगी असतात; ते चालू राहिलेच पाहिजेत. असे परस्पर विरुद्ध कार्यक्रमांचे गाठोडे वित्तमंत्र्यांनी अंदाजपत्रकाच्या नावाने लोकसभेसमोर ठेवले. दावोस येथे पंतप्रधानांनी 'मध्यममार्गी' आर्थिक धोरणाचे तत्त्वज्ञान मांडले ते अशा गाठोड्याचेच. समाजवादाची स्पप्ने पाहणाऱ्या नेहरूंनी 'समाजवादी धाटणीची समाजरचना' असा मध्यममार्ग काढला आणि सारा देश नोकरदारांच्या हाती सोपवला. खुल्या व्यवस्थेचे स्वप्न पाहणारे नरसिंहराव 'खुल्या पद्धतीच्या समाजरचने' चा व्यवहारी मध्यममार्ग धरत आहेत. नवी व्यवस्था म्हटले तर खुली, पण सारी महत्त्वाची नियंत्रणे सरकारच्या हातीच. 'समाजवादी धाटणीच्या समाजरचने'चा पुरस्कार करून सत्ता हाती ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा अबाधित.
पूर्णता म्हणजे विनाश?

 अंदाजपत्रक सादर केल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत वित्तमंत्र्यांनी एक

९०
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने