पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. तीन तोंडाचे अंदाजपत्रक


चित्रपटाचा नवा हीरो मनमोहन
 डॉ. मनमोहन सिंग यांनी आपले चौथे लागोपाठचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर केले. १२९ क्रिकेटसामन्यापैकी १२८ सामन्यांत खेळणाऱ्या कपिल देवच्या बरोबरीचा हा उच्चांकच झाला. सिंग साहेबांचे अंदाजपत्रकी भाषण कपिल देवच्या खेळाप्रमाणेच चित्तवेधक फटकेबाजीचे होते. चिंतामणि द्वारकानाथ देशमुखानंतर अंदाजपत्रकी भाषण करतांना दीड-दोन तास श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचा चमत्कार मनमोहन सिंग करून दाखवत आहेत. दूरदर्शनवर अंदाजपत्रकी भाषण दाखवले जाते म्हणून लोक ऐकतात असे नाही; झी चॅनेलवर चित्रपट दाखवला जात होता तरी लोक मनमोहन सिंगांचे भाषण ऐकत होते. नाट्य, शेरोशायरी, सस्पेन्स, हलके फुलके विनोद, काय पाहिजे ते त्यांत होते.
 सी. डी. देशमुख भाषणात अभिजात संस्कृत साहित्यातील अवतरणे देत आणि अनेकवेळा उस्स्फूर्त काव्यरचनाही करीत. मनमोहन सिंगांचा भर शेरोशायरीवर. पण त्यांची निवड शायरीचा सखोल अभ्यास असणाऱ्या सच्च्या जाणकाराची नाही; पाच पन्नास मशहूर शेर कानांवरून गेलेल्या किरकोळ दर्दीची आहे. त्यांच्या शायरी अवतरणांनी लोकसभेतील काँग्रेस सदस्यांना बाके बडवण्याची संधी मिळाली, पण अर्थमंत्र्यांच्या भाषणाची शान कमी झाली, वाढली नाही. पंतप्रधानांच्या थोर नेतृत्वाचा त्यांनी वारंवार आग्रहाने उल्लेख केला. सारी हयात लांगूलचालन करणाऱ्या एखाद्या काँग्रेसी पुढाऱ्याच्या तोंडीदेखील असली बाष्फळ स्तुती आता ऐकवत नाही. डॉ. मनमोहन सिंगांच्या तोंडी पंतप्रधानांची वारेमाप स्तुती बीभत्स वाटत होती.
मनमोहनांची संमोहन विद्या

 आर्थिक सुधार, खुली व्यवस्था यासंबंधीची धोरणे मांडतांना अर्थमंत्री, हयात काँग्रेसमध्ये काढलेल्या पुढाऱ्यांपेक्षादेखील पक्षाभिमानाचा आक्रमक पवित्रा घेतात. आर्थिक सुधार आणि काँग्रेसपक्ष तथा पक्षाचे नेते नरसिंह राव यांचा त्यांनी असा काही संबंध जोडून दिला आहे की काँग्रेस म्हणजेच खुली व्यवस्था असा भास निर्माण व्हावा. मनमोहन सिंग ज्या

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
८९