पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 डंकेलविरोधी लोक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना वारंवार एक प्रश्न विचारतात. अमेरिकेतली, युरोपमधली, जपानमधली शेतकरी मंडळी डंकेलविरोधी आहेत. फ्रान्सच्या शेतकऱ्यांनी तर डंकेलविरोधात दंगे केले. हिंदुस्थानातही शेतकरी आंदोलनाचे काही नेते डंकेलला विरोध करीत आहेत. तुम्हीच तेवढे डंकेलला पाठिंबा देता हे कसे काय?
 हिंदुस्थानातील स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारी काही मंडळी डंकेलला विरोध करीत आहेत ही गोष्ट खरी. ती का विरोध करीत आहेत हे समजणे किंवा सांगणे कठीण आहे! काही महिन्यांपूर्वी डंकेल प्रस्ताव अंमलात आला तर शेतकऱ्याला घरचे बियाणे वापरता येणार नाही, घरात पैदा झालेली कालवड डंकेल घेऊन जाईल, अशा तऱ्हेच्या विनोदी अफवा ते पसरवत होते. डंकेल प्रस्तावात असे काही नाही हे आता स्पष्ट झाले आहे. औषधकारखानदारांच्या प्रचारकांनी हा बाष्कळ युक्तिवाद सोडून दिला, तेव्हापासून हे शेतकरी नेते आता खुल्या व्यापारामुळे आणि पेटंट कायद्यामुळे भारत पुन्हा एकदा गुलाम होणार अशा तऱ्हेच्या कंड्या पिकवीत आहेत. ही मंडळी डंकेलला विरोध का करतात? याची चौकशी आणि संशोधन CID कडे दिले तर कदाचित पत्ता लागेल!

 देशी शेतकरी नेत्यांचा विरोध आणि फ्रान्ससारख्या देशातील शेतकऱ्यांचा विरोध यांचा परस्पर संबंध काहीही नाही. अमेरिकेतील आणि फ्रान्स येथील काही शेतकरी नेते मला भेटले होते. हिंदुस्थानातील शेतकऱ्यांनीही डंकेल-विरोधी आघाडीत सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा विरोध डंकेल प्रस्तावातील आंतरराष्ट-ीय व्यापारसंबंधींच्या तरतुदींना आहे. भारतातील शेतकरी 'बौद्धिक संपदेच्या' हक्क्याच्या मुद्द्यांवर म्हणजे 'पेटंट पद्धती'च्या प्रश्नावर डंकेल प्रस्तावांना विरोध करताहेत हे कळल्यावर त्यांना मोठे आश्चर्य वाटले! बौद्धिक संपदेच्या प्रश्नावर हरकत असायचे कारणच काय, हेच त्यांना उमजेना. शेतकऱ्यांचा विरोध सरकारी मदत, सूट, सबसिडी टप्प्याटप्प्याने कमी करण्याच्या तरतुदींना असला पाहिजे अशी त्यांची स्पष्ट भूमिका. फ्रान्समधील शेतकऱ्यांना जवळजवळ ६०% सबसिडी आहे पण तरीही शेतीत उभे राहायला नव्या पिढीत कोणी तयारच होत नाही, ही त्यांची तक्रार आहे. फ्रान्समधील शेतकऱ्यांच्या दोन संघटना

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
८५