Jump to content

पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शब्दाचा अर्थ आहे.
इंडियातील ज्ञानपरंपरा!
 हिंदुस्थानातली पद्धत वेगळी आहे. आपल्याकडे अमुक एक विद्या आहे असं सांगणारे लोक खूप आहेत. अमक्या बाबाला समोरच्या माणसाच्या मनात काय आहे ते अंतर्ज्ञानाने कळते असे म्हणतात. पण अशा विद्येचं पेटंट घेतल्याचं काही ऐकीवात नाही. किंवा गावामध्ये एखाद्या माणसाला एखाद्या रोगावरचं झाडपाल्याचं औषध माहीत असतं. तो ते लोकांना फुकट देईल पण त्या औषधाची माहिती तो कोणालाही, अगदी स्वत:च्या मुलालाही न सांगता मरून जातो आणि त्याचं त्याबाबतीतलं ज्ञान त्याच्या बरोबर संपतं. विद्येबाबत आपली परंपराच ही आहे. विद्या ही फक्त ब्राह्मणांनीच करायची. इतरांना तो अधिकार नाही. म्हणजे मग जी काही विद्या असेल, ज्ञान असेल ते ब्राह्मणाकडेच राहाणार; समाजाने आम्हाला विद्वान म्हणावे आणि इतर कामे करत राहावे. अशी एक भारताची मोठी परंपरा आहे आणि त्याच परंपरेचा भाग म्हणजे आम्ही ज्ञान साठवून ठेवतो, देत नाही. परिणामी 'ज्ञान दिल्यानं वाढतं, ठेवल्यानं संपतं आणि चोरी केल्यानं लाभत नाही' अशी साहित्यातील वाक्यं साहित्यातच राहिली आणि जगाच्या इतिहासामध्ये भारत हा अडाण्यातला अडाणी, संशोधनाच्या बाबतीत अत्यंत मागासलेला राहिला.
उद्योजक डावलले

 या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यानंतर काय धोरण अवलंबायला हवं होतं? संशोधन झालं नाही याला कारण 'ब्राह्मणी' व्यवस्था हेच आहे. (यात मला 'मंडल'वाद वगैरे मांडायचा नाही.) संशोधन कुठं होतं? ज्याचे पाय जमिनीवर असतात तो जमिनीचं संशोधन करतो. लोहार त्याच्या लोखंडावर ठोके मारता मारता, जर त्याला काही अडथळा आणला नाही तर कधीतरी आपल्या कामामध्ये अधिक सुबकता कशी आणता येईल, याचा विचार करू शकतो. चांभार आपल्या चामड्याच्या कामाबद्दलही असंच करू शकतो. पण ज्यांनी प्रत्यक्षात हाताचं काम करायचं त्याचा विचारच मुळी पांगळा राहावा, म्हणजे त्याला शब्दाचं सामर्थ्यच मिळू नये अशी व्यवस्था आली. त्यामुळे असे उद्योजक संशोधन करू शकले नाहीत. जर या उत्पादकांच्या हाती संशोधन दिलं असतं, जर हे उत्पादक संशोधन करू शकले असते तर हिंदुस्थान

७८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने