पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे काही असं राहिलेलं नाही. नवीन संशोधनाकरिता प्रचंड संशोधनशाळा असते. त्याचा पडताळा घेण्याकरितासुद्धा फार प्रचंड खर्च करावा लागतो. संशोधन हे काही एकट्या दुकट्याचं काम राहिलेलं नाही, हजारो लोकांना एकत्र काम करावे लागते. प्रत्येकजण संशोधनाचा एखादा लहानसा भाग सांभाळत असतो. या संशोधनाची किंमत आता, एडिसनच्या काळात धरली गेली नसेल तशी न धरून चालणार नाही. नवीन संशोधन करायला धन हवंच ना? यामध्ये, झालेल्या संशोधनाचा खर्च भरून काढण्यापलीकडे त्यानंतर पुन्हा जे नवीन संशोधन करायचं त्यासाठी पैसा उभा करायला पाहिजे ही भूमिका असायला हवी आणि संशोधन आता संपलं, यापुढे संशोधन करण्यासारखं राहिलं नाही असं काही विज्ञानाच्या बाबतीत नसतं. असं फक्त धर्माच्या किंवा अध्यात्माच्या क्षेत्रात असू शकेल! विज्ञानाच्या बाबतीत प्रत्येक संशोधन हे एक पाऊल पुढे पडलेले, त्याचा खर्च भरून निघाला तर त्याच्या पुढचे पाऊल टाकता येईल. अशा परिस्थितीत साहजिकच संशोधनाचा खर्च भरून निघाला पाहिजे ही संशोधकांना पैसे देणाऱ्या लोकांची धारणा आहे. इथंच हिंदुस्थानच्या बाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न तयार झाला.
'पेटंट'चा अर्थ

 आपण संस्कृतमधलं एक सुभाषित वापरतो की ज्ञान दिल्याने वाढते आणि ठेवल्याने कमी होते. पण आपल्याकडील परंपरा ही ज्ञान झाकून ठेवण्याची आणि कुलुपबंद ठेवण्याची आहे. परदेशात जे संशोधक संशोधन करतात त्यांनी संशोधन लपवून ठेवू नये; जे काही संशोधन केलं असेल ते कागदावर व्यवस्थित नकाशे, आलेख, आराखडे, फोटो, आकडेवारी यांबरोबरच त्याचे जे काही पडताळे घेतले असतील त्यांच्या अनुभवांसकट लिहून काढावे; आपल्या संशोधनात नवीन काय आहे, त्याचा उपयोग काय आहे हे स्पष्ट मांडावं आणि समाजाला ते द्यावं; आणि त्याच्या कृतज्ञतेपोटी समाज त्या माणसाला त्याच्या संशोधनाचा खास उपयोग करण्याचा अधिकार काही मर्यादित काळापर्यंत, म्हणजे पाच वर्ष, दहा वर्षे, पंधरा वर्षे इत्यादि देतो; त्या काळात त्या संशोधनाचा उपयोग दुसरा कोणीही त्याच्या परवानगीशिवाय करू शकणार नाही असं समाज त्याला सांगतो. याचा अर्थ संशोधकाला 'पेटंट' दिला जातो. साध्या भाषेत सांगायचं तर हाच 'पेटंट' या

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
७७