पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या तीनही मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्याची ही जागा नाही. पण, उरूग्वे बोलणी सुरू झाली त्यावेळच्या परिस्थितीत नसलेल्या या तीन मोठ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे या बोलण्यातून काही फलनिष्पत्ती खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात बाहेर आली. पण खऱ्या अर्थाने खुली अर्थव्यवस्था जर हवी असेल तर अशी खुली देवघेव फक्त वस्तूंची असून चालत नाही. सेवांचीही असेल. त्याबरोबरच, गुंतवणुकीलासुद्धा कसला अटकाव असता कामा नये. नाही तर, तंत्रज्ञानाच्या बाबती भिंती उभ्या राहातील, या देशातील तंत्रज्ञान त्या देशात जाऊ शकणार नाही. जे काही नैसर्गिक, भौगोलिक फायदे आहेत ते फक्त त्या त्या देशांनाच मिळतील, दुसऱ्या देशातील लोकांना मिळवता येणार नाहीत. म्हणून, वस्तू जगामध्ये मुक्तपणे फिरल्या पाहिजेत तसं भांडवलसुद्धा फिरलं पाहिजे.
भांडवलाची खुली देवघेव

 पण, भांडवल म्हणजे काय? यंत्र म्हणजे भांडवल ही गोष्ट खरी. पण, एका यंत्राची किंमत जर हजार रुपये असली तर त्या यंत्राची शारीरिक किंमत केवळ पन्नास शंभरच रुपये असेल आणि त्या यंत्राच्या किंमतीतला साडेनऊनऊशे रुपयांचा भाग ते यंत्र तयार करण्याकरिता झालेल्या संशोधनाचा खर्च असतो. तो त्या यंत्रात दिसत नाही. एडिसनने विजेचा दिवा तयार करण्याकरिता आधी शेकडो प्रयोग केले, शेवटचा प्रयोग यशस्वी झाला. आधीचे सगळे अयशस्वी झाले. बल्बच्या निर्मितीतील या आधीच्या सगळ्या प्रयोगाचा खर्च लक्षात घ्यायला हवा की नाही? एडिसनने कदाचित तो लक्षात नसेल घेतला, पण आजच्या संशोधकांना हा खर्च लक्षात घेणं भाग आहे. म्हणजे, जर का भांडवल मुक्तपणे फिरावं असं वाटतं असेल तर याचा अर्थ हा की भांडवलावर बंधनं असता कामा नये, ते थांबवता कामा नये; आपलं भांडवल बळजबरी ढकलता कामा नये आणि त्याबरोबरच भांडवलाची चोरीसुद्धा थांबली पाहिजे. कारण चोरी सुरू झाली की तिथं व्यापार राहात नाही. तुम्ही एक तर चोरी करू शकता, किंवा व्यापार करू शकता. एडिसनच्या काळी एकेकटा शास्त्रज्ञ घराच्या एखाद्या खोलीमध्ये किंवा गॅरेजमध्ये बसून रात्रंदिवस काम करून, तहानभूक हरवून अशा पद्धतीने संशोधन करीत असे अशी वर्णनं वाचायला मिळतात. पण नवीन संशोधन

७६
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने