गॅट ने बौद्धिक संपदा हक्क संघटनेच्या क्षेत्रात हात का घातला? याचं उत्तर डंकेल प्रस्तावाच्या या अध्यायाच्या नावातच आहे. अध्यायाचं नाव आहे Trade Related Intellectual Property Right म्हणजे व्यापाराशी संबंधित बौद्धिक संपदेचा हक्क. याचा संक्षेपाने उल्लेख नेहमी (टि-प्स) असा होतो. व्यापार हे गॅटचं क्षेत्र, बौद्धिक संपदा हे WIPO चं क्षेत्र. पण व्यापारसंबंधी बौद्धिक संपदा हे गॅटचं क्षेत्र आहे असं गॅटचं म्हणणं आहे आणि त्याबद्दल या दोन संस्थांमध्ये फारसे वाद नाहीत.
परिस्थितीतील बदल
उरूग्वेमधील वाटाघाटींची फेरी १९८६ साली सुरू झाली. त्यावेळी सगळ्या जगातली परिस्थिती थोडी बिघडलेली होती. ९० सालापर्यंत, या वाटाघाटी इतक्या यशस्वी होतील असं काही वाटलं नव्हतं. पण ८६ सालानंतर जागतिक परिस्थिती इतकी बदलली की ९०-९१ साली जगामध्ये खऱ्या अर्थाने खुली अर्थव्यवस्था सुरू होईल अशी आशा वाटायला लागली. प्रामुख्याने, याची तीन कारणं आहेत.
पहिलं कारण म्हणजे समाजवादी साम्राज्य कोसळलं. खुल्या अर्थव्यवस्थेचा पक्का अडसर दूर झाला. खुल्या बाजारपेठेला न मानणारे लोक संपले. दुसरी गोष्ट अशी झाली की खुली अर्थव्यवस्था तत्त्वत: मानणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांमधे फार भयानक व्यापारी स्पर्धा सुरू झाली. इतके दिवस अमेरिका सर्वश्रेष्ठ होती तोवर त्यांना चिंता नव्हती पण आता पूर्वीचे छोटे, पण विकसित देश आता इतके पुढे गेले की दुसरं महायुद्ध प्रत्यक्षात कुणी जिंकलं याबद्दल शंका वाटायला लागावी. जर्मनी आणि जपान हे हरलेले देश आज व्यापारामध्ये अमेरिकेच्याही वर कुरघोडी करायला सज्ज झालेले आहेत. या दोघांमधला व्यापार जर का मित्रत्वाच्या पद्धतीचा झाला नाही, शेजाऱ्याचा गळा कापायच्या दृष्टीने झाला तर व्यापार काही फार टिकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तिसरा मुद्दा असा की, हिंदुस्थानासारखे गरीब देश, समाजवादाची भाषा करणारे, रशियातील समाजवाद गडगडल्याबरोबर भानावर आले आणि समाजवादी अर्थव्यवस्था ही काही उपयोगी नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि तेही आता खुल्या अर्थव्यवस्थेकडे जायला लागले आहेत.