पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६. डंकेल, उद्यमी शेतकरी आणि बांडगूळ बिगर शेतकरी


सर्वदूर बंदिस्त व्यवस्था
 खुल्या अर्थव्यवस्थेकडे देश चालला आहे की नाही ते जसं आपण पाहातो तसंच आपल्याला जग खुल्या अर्थव्यवस्थेकडे चाललंय की नाही हे पाहिले पाहिजे.

 नेहरूव्यवस्थेने देशाचे छोटे छोटे कप्पे चाळीसपन्नास वर्षांपूर्वी केले. सगळ्या जगाचे कप्पे पहिल्या महायुद्धापासून पडलेले आहेत. प्रत्येक देशाने खुला व्यापार करायच्या ऐवजी आपापल्या देशातल्या लोकांचं संरक्षण करण्याकरिता आयातीवर निर्बंध घालायचे आणि निर्यातीना उत्तेजन द्यायचं अशा तऱ्हेची धोरणं आखल्यामुळे गेल्या पन्नास वर्षांमध्ये खुला व्यापार, खुली अर्थव्यवस्था किंवा बळीराज्य नावाची गोष्ट सगळ्या जगातच संपून गेली. दुसऱ्या महायुद्धानंतरही ती कुठे नव्हती. जेव्हा संयुक्त राष्ट-संघ (युनो) तयार झाला त्यावेळी एक कल्पना अशी होती की आता युद्ध संपलं, मग पन्नास वर्षांपूर्वी जगात जसा खुला व्यापार चालू होता तसा पुन्हा एकदा सुरू व्हावा. अशी अनेक देशांची इच्छा होती. यूनोच्या स्थापनेच्या वेळी खरी कल्पना अशी होती की आंतरराष्ट-ीय व्यापार संघ नावाची एक मोठी संस्था स्थापावी आणि त्याने सगळ्या जगामध्ये खुला व्यापार चालेल अशी व्यवस्था करावी. International Trade Organisation असं त्या संस्थेचं नाव ठेवायचं होतं, पण त्या संस्थेचं बारसं व्हायच्या आधीच ती मृत झाली. कोणत्याही देशाची खुल्या व्यापाराकडे जाण्याची निदान त्यावेळी तरी मन:स्थिती नव्हती. ज्या त्या देशामध्ये लोकांना सरकारकडून संरक्षण घेऊन आपला कामधंदा, व्यवसाय चालविण्याची सवय झालेली होती. आज हिदुस्थानातले कारखानदार जसं, आम्हाला असलेलं संरक्षण तुम्ही कमी करू नका म्हणतात, फ्रान्समधले शेतकरीसुद्धा आज असंच म्हणतात तसंच त्यावेळी ज्यांना ज्यांना संरक्षणाची सवय झालेली होती ते काही संरक्षण सोडून द्यायला तयार नव्हते. तेव्हा, अशा प्रकारचा खुला व्यापार जगामध्ये लवकर सुरू होईल असं काही वाटत नव्हतं. मग, संयुक्त राष्ट-संघाचं कामच मुळी असं ठरलं की जिथे समझोता होण्याची शक्यता नसते तिथे सर्व संबंधित लोकांना बोलवायचे, त्यांची मनधरणी करून एकत्र बसवायचं आणि जे बोलायला तयार नाहीत त्यांना एकमेकांशी बोलायला

६२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने