पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. जसं, जॉर्ज फर्नांडिस आता शेतमजुरांच्या कळवळ्यानं बोलू लागले आहेत तसं शेतकऱ्यांचा कधीही कळवळा नसलेली मंडळी ही आता अशा तऱ्हेचे प्रश्न घेऊन उठून उभे राहायला लागलेली आहेत.
 आपण आता बोलायला पाहिजे की, खताचा भाव वाढला हे खरं तर चांगलं झालं. मी त्याच्यापुढं जाऊन असंही म्हणतो की गेल्यावेळी तीसच टक्के वाढला, यावेळी आणखी तीस टक्के वाढायला पाहिजे होता. पण, आपण बोलत काही नाही. फक्तः लेख लिहितो. पत्रकारानासुद्धा आपली भूमिका कळत नाही. पण आम्ही या विषयावर बोलत नाही म्हणून आमंच अस्तित्वच नाही असा कुणाचा गैरसमज होऊ नये. म्हणून, आंदोलन करायची आवश्यकता आहे. म्हणून ते करायचं. देशात गव्हाचं उत्पादन मुबलक झाले हे मलाही माहीत आहे. पण, यंदा गहू आणतील. पुढच्या वर्षी गहू आणायला पैसे कोठून आणतील? पुढच्या वर्षी सरकार कोंडीत सापडेलच ना? पण, शेतकरी संघटनेने गहू उतरविणाऱ्या बंदराच्या नाकेबंदीचा आणि मंत्र्यांना गावबंदीचा कार्यक्रम जो जाहीर केला आहे त्यात सूट-सबसिडीचा शोध घेण्याऱ्या शेतकऱ्यांची नाही, तर खुल्या व्यवस्थेमध्ये मनुष्य म्हणून सन्मानाने जगू इच्छिणाऱ्या उद्योजक शेतकऱ्यांची संघटना काय मागते हे स्पष्ट होण्याकरिता आपल्याला ही आंदोलनं घेणं आवश्यक आहे.
 गावबंदीचा कार्यक्रम तर सोपाच आहे. मंत्र्याला झेंडे दाखवायला शेतकरी आनंदाने तयार होतील. आणि नाकेबंदीमागची भूमिका शेतकऱ्यांच्या पुढे मांडा, ते गव्हाचा दाणा बंदरात उतरू देणार नाहीत.

(२१ ऑक्टोबर १९९२)

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
६१