पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजायचं की आता आपण इतिहास घडवतो. शिवाजी दोन वेळा त्याच वेशात कधी पृथ्वीवर येत नाही. प्रत्येक वेळी येतो, त्यावेळी त्याचा वेश नवा असतो. या नव्या वेशामध्ये यायची जर का तुमची तयारी असली तर शेतकरी संघटनेची भूमिका तुम्ही पार पाडू शकाल.
आंदोलन कशासाठी
 खुल्या बाजारपेठेच्या पुरस्काराची मांडणी करीत असतानाच शेतकरी संघटना आंदोलनात्मक कार्यक्रमाचे दोन निर्णय घेत आहे. पण, हे निर्णय या भूमिकेशी विसंगत नाहीत हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
 ज्या लोकांनी शेतकरी आंदोलनाला नेहमी विरोध केला, ज्या लोकांनी शेतकरी आंदोलनाचा द्वेष केला, ज्या लोकांनी एस्. आर. पी. ला वायरलेसवरून आंदोलक शेतकऱ्यांच्या हालचालींची माहिती पुरवली ती मंडळी आता झेंडे घेऊन खत भाववाढ रद्द झालीच पाहिजे, विजेची दरवाढ बंद झालीच पाहिजे अशा घोषणा देतात. एवढंच नव्हे तर, शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी कुठे गेले आहेत अशी भाषणं देत आहेत. ही मंडळी कोण आहेत? ही मंडळी प्रामुख्याने काँग्रेसमधली आहेत. कोण्या एका कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, फलाण्या खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ही सगळी मंडळी आता बाहेर पडली आहेत. कारण, मनमोहनसिंगाना जरी समजलं नाही की हा शेतकऱ्यांचा चाप त्यांना कुठं बसतो आहे, तरी या मंडळींना हा चाप कळायला लागला आहे. नेहरूव्यवस्थेमध्ये शेतीमालाला भाव नसतांनासुद्धा ज्या पुढाऱ्यांनी आपलं भलं करून घेतलं त्या पुढाऱ्यांना आता भलं करून घेता येणं शक्य राहिलं नाही. या दुःखानं ती मंडळी ओरडायला लागली आहेत. ही गावगन्ना कृषिउत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्रीसंघाची माणसं ओरडायला लागली आहेत कारण, खुल्या बाजारपेठेचा चाप त्यांना बसायला लागला आहे. परवा पंतप्रधानांना शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं. त्यातल्या लोकांची नावंसुद्धा याआधी कधी ऐकायला मिळाली नव्हती. पण, पंतप्रधानांनी त्यांना भेट दिली, मुलाखतीचं दृष्य टेलिव्हिजनवर तीनतीनदा दाखवलं. आणि वर प्रत्येकाला दोन हजार रुपयांची दक्षिणा देऊन त्यांना पंतप्रधानांनी पाठविलं. याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या नावाने एक पर्यायी शक्ती उभी करण्याचा प्रयत्न होऊ लागला