आहे. त्यांची मांडणी बरोबर होती, त्यांचं लिखाण बरोबर होतं, त्यांचा कार्यक्रम बरोबर होता, त्यांचं तत्त्वज्ञान बरोबर होतं पण त्यांच्यासमोर अडथळा होता तो नेहरूघराण्याच्या भक्तीचा आणि त्यातून निर्माण झालेल्या लायसेन्स्परमीट नेहरूधोरणाचा. त्यामुळे तो प्रयोग फसला. या जुन्या प्रयोगाचा पुरस्कार करायचा असला तर करा किंवा नका करू, पण उद्योजकांना आपली मागणी पुढे मांडण्याची संधी मिळालेली आहे. आणि ही जर संधी साधली गेली तर मग शेतकऱ्याची बदलेली जी भूमिका आहे तिचा सन्मान झाला असं होईल. आम्ही इतके दिवस डाव्यांच्या बरोबर जात होतो. कारण ते लढायला तयार होते. व्यापारी लढायला तयार नव्हते. आणि लोकांना आम्ही त्यावेळी काय म्हणत होतो? शेतकरी आणि मजूर यांत काय फरक आहे? शेतकऱ्यांकडे फक्त जमीन आहे एवढंच की नाही? पण, आम्हाला वेतनसुद्धा पुरसं मिळत नाही.
शेतकरी : स्वनियुक्त उद्योजक
शेगावपासून आम्ही ही भूमिका सोडून देतो आहोत. शेगावपासून शेतकरी हा उद्योजक आहे, स्वनियुक्त (Self employeed). त्याची निश्चित पगाराची मागणी नाही. तर, स्पर्धा करून, बाजारात उतरून स्वतंत्रपणे क्षणाक्षणाने, कणाकणाने जगण्याची इच्छा असलेला असा हा उद्योजक शेतकरी आहे. असे जे जे उद्योजक असतील ते ते आमचे मित्र आहेत. आणि सकाळी १० वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत टेबलापाशी बसून चौदा कप चहा पिऊन एक तारखेला पगार मिळाला पाहिजे, त्यानंतर महागाईभत्ता मिळाला पाहिजे, दर सुट्टीमध्ये घरी किंवा टीपला जायला प्रवासभत्ता मिळाला पाहिजे आणि निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळायला पाहिजे असं म्हणणारा मनुष्य आमचाच नव्हे तर देशाचा शत्रू आहे. ही भूमिका मांडण्याचं नेतृत्व तुम्ही शेतकरी कार्यकर्ते घेत असाल तर शेतकरी आंदोलनाची भूमिका तुम्ही खऱ्या अर्थाने बजावता आहात असं म्हणता येईल.
नाही तर काय होईल? डॉन क्विग्झोट सारखं किंवा ऐतिहासिक बहुरूप्यांसारखं होईल. जुनी इतिहासातली पुस्तकं वाचायची किंवा शिवाजीवरची पुस्तकं वाचायची आणि शौर्य गाजवायला निघायचं म्हणजे शिवाजीसारखं चिलखत आणि जिरेटोप घालून घोड्यावरून निघायचं आणि