पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे तर हौशेगवशेनवशे नियोजक. रशियातला नियोजनाचा जनक गेल्यावर जर तुम्ही या नियोजनाची पाळंमुळं हिंदुस्थानातून उखडून काढली नाही तर तुम्हाला पुन्हा कधी तसा मोका मिळणार नाही.
 ही मांडणी लेखांमधून केल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर १९९२ या काळात या मांडणीच्या कच्च्या अभ्यासावर नेहरूनीती पुतळ्याच्या दहनाचा कार्यक्रम, काहीसा हात राखून केला याच्याबद्दल माझ्या मनात काही राग नाही. उलट, ही प्राथमिक परीक्षा झाली. जसं, एखादं इंजेक्शन एखाद्या रोग्याला दिल्यावर त्याला ते सोसेल की नाही हे पडताळण्यासाठी डॉक्टर त्या इंजेक्शनचा आधी बारीकसा डोस देऊन पाहातात तसं हे पहिलं बारीकसं इंजेक्शन झालं. आता दुसरं इंजेक्शन द्यायचं किंवा नाही हे बघा. पण, नेहरूवाद संपला आहे, आता नेहरूवादाचं भूत गाडून टाकायला पाहिजे अशा आशयाचा तो लेख लिहिल्यानंतर माझ्या मनात आशा वाटली होती की शेतकरी संघटनेच्या गेल्या दहा वर्षातील नेहरूवादाविरोधाच्या परंपरेचा परिणाम म्हणून शेतकऱ्याचं एखादं तरी पोरगं उठेल आणि 'पागल' पणा करून दाखवेल. माझी आशा फोल ठरली.
 आता प्रश्न उरतो तो म्हणजे नेहरूवादाच्या विरोधात राजकीय आघाडी उभी करायची का आणखी काय करायचे? आघाडी उभी करायची तरी कशी करणार? एक धडा आपल्याला, सुरुवातीला 'स्वतंत्र पक्षा' ने जो प्रयत्न केला त्यापासून मिळतो. खुल्याबाजारपेठेच्या बाजूने कोण आहे, विरुद्ध कोण आहे?
प्रशासन : झारीतील शुक्राचार्य

 हिंदुस्थानामध्ये नेहरूवादाने खरं कौतुक आणि कल्याण कोणाचं केलं असेल तर ते नोकरदाराचं. आज पी. व्ही. नरसिंहराव सरकार समोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे? तुम्ही खुल्या बाजारपेठेविषयी बोला खूप, निर्यातीविषयी बोला खूप, पण हिंदुस्थानला निर्यात करणं शक्य नाही. याचं कारण कारखानदारांची अकार्यक्षमता तर आहेच, पण सगळ्यात अडथळा कोणता असेल तर तो देशाच्या प्रशासनाचा आहे. कोणत्याही कारखानदाराला विचारलं तर तो म्हणेल की निर्यातीआड सगळ्यात मोठी डोकेदुखी प्रशासन हलविण्यात आहे. प्रशासनाचं जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत या देशातले

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
५७