पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तरी चारपाच काँग्रेसवाले असे गदारोळ करतील की पी. व्ही. नरसिंहरावना तिथं खुर्चीवर बसणं अशक्य होईल.
 मग, नेहरूनियोजनाला तात्त्विक विरोध करणाऱ्या माणसांची तो विरोध जाहीरपणे मांडण्याची जबाबदारी रहाते. नेहरूनी गांधीविचाराला - ग्रामअधिष्ठित अर्थव्यवस्थेला लेखी विरोध केलेला आहे. त्यांनी तो अंमलात आणून दाखवला आहे. आणि तो अंमलात आणून दाखवितांना जो नांगर चालवला तो शेतकऱ्यांच्या घरावर चालला. त्या धोरणाचे शेतकरी बळी ठरले. चीड कशाची यायची आणि कशाची येऊ द्यायची नाही? आपल्या देशातल्या समाजवाद्यांची नेहरूविषयीच्या कौतुकामागची भावना वेगळी आहे. शेतकऱ्यांचे दु:ख ज्याच्या आतड्यापर्यंत पोहाचलं आहे त्याला नेहरूच्या गुलाबाचं कौतुक वाटता कामा नये. ज्यांना नेहरू धोरणाला विरोध करणे अजूनही रास्त वाटत नाही त्यांच्या आतड्यापर्यंत हे दुःख पोहोचलं आहे किंवा नाही ही शंका आहे. दहा वर्षे आम्ही लढाई केली आणि नेहरूंच्या आर्थिक नियोजनाच्या पद्धतीमुळे देशाचं वाटोळं झालं हे सिद्ध केलं. आणि तरीसुद्धा नेहरूघराणेशाहीमुळे भीती वाटून, चूक झाली ती नेहरूधोरणाची झाली हे म्हणण्याइतकी बौद्धिक प्रामाणिकता जर सुशिक्षितांकडे नसेल तर सुशिक्षितांना बौद्धिक प्रामाणिकपणा शिकविण्याचं काम अशिक्षित, अडाणी शेतकऱ्यांना करायला पाहिजे.
 नेहरूवादाचा किंवा नेहरूंचा विरोध हा काही शेतकरी संघटनेने पहिल्यांदा मांडलेला मुद्दा नाही. आजपर्यंत जे काही आम्ही लिहिलं आहे ते वाचलं किंवा आजपर्यंत बोललेलं ऐकल्याचं आठवलं तरी हे लक्षात येईल. आणि आता जर का नेहरूवादाच्या विरोधाला टोक आणण्याचं काम केलं नाही तर काय दहा वर्षांनी करायचं?

 दहा वर्षांनी या गतीने सर्व संपलेलं असेल. या विरोधाला जर टोक आणायचं असेल, नेहरूवादी पद्धती का खुली बाजारपेठ याचा निकाल लावायचा असेल, तर ती वेळ आज आहे. रशियन तथाकथित समाजवादी साम्राज्य कोलमडलं आहे. आणि त्या आधाराआधाराने राहाणारे तिसऱ्या जगातील टिनपाट नियोजक, हौशी नियोजक - रशियातल्या लोकांनी व्यावसायिकरित्या शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न तरी केला -

५६
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने