पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जमीनवाटपाचा नाही. जमीनवाटप करून हा प्रश्न सुटणार नाही. सामूहिक शेतीकरून कुणाचं कल्याण झालं नाही. भारतातला शेतकरी कष्टाळू आहे. त्याला चांगलं जगण्याची थोडी आशा दाखवा मग तो शेती चांगली करून दाखवेल.' पण, असं म्हणणाऱ्या लोकांना आम्ही लोकविरोधी समजलो आणि केवळ छातीवर गुलाब लावतात म्हणून आणि गोरेपान दिसतात म्हणून काही राजबिंड्याचं कौतुक केलं.
 चूक उमगल्यावर ती आम्ही लपवून ठेवली नाही. उलट, उघड उघड नेहरूवादाचा विरोध केला. आम्ही काही नेहरूवादाचा विरोध आज सुरू केला नाही. माझ्या ८०/८५ सालांतील लेखांमध्ये नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका करतांना राजबिंडे हा शब्द वापरलेला आढळेल. फक्त, मी टीका करतांना संयम वापरला. त्यांच्यावर टीका करतांना कधी, इतर मंडळी त्यांच्या वैयक्तिक चारित्र्याविषयी चर्चा करतात तशी चर्चा केली नाही. आपलं हे आंदोलन चालू झाल्यानंतर काहींनी मला त्यांच्या वैयक्तिक चारित्र्याविषयी माहिती पुरविण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही जो काही विरोध करतो आहोत ते नेहरूच्या सार्वजनिक धोरणांना करतो आहोत. त्यामुळे, ते वैयक्तिक बाबतीत कसे होते याची चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. हा लढा धोरणाचा आहे. नेहरूंचे पुतळे जे उभे आहेत ते नेहरू काही एखाद्या सिनेनटापेक्षा चांगले दिसतात म्हणून उभे नाहीत, नेहरूचे पुतळे उभे आहेत ते त्यांच्या धोरणाचं प्रतिक म्हणून उभे आहेत.
नेहरूनीतीला विरोध करणार कोण?

 मग, या विरोधाला टोक आणयचं असेल तर काय करायला पाहिजे? एका बाजूला देशाचं दिवाळं वाजलं आहे. देशाला बाहेरची कर्ज फेडता येत नाहीत, देशातली कर्ज फेडता येत नाहीत. सर्वजण मान्य करतात की नेहरूवादी नियोजनामुळे हे झालं. अगदी, पी. व्ही. नरसिंह राव, मनमोहनसिंग म्हणतात की गेल्या चाळीस वर्षांतली दिशा आपल्याला बदलायला पाहिजे. टग्यांचे निगरगट्ट पुढारीसुद्धा म्हणू लागले आहेत की चाळीस वर्षं आमची चूक झाली. पण, कुणी असं म्हणायला तयार नाही की ही चूक झाली ती नेहरूंच्या धोरणाची. याचं कारण काय? नेहरू घराण्याचा दबदबा इतका आहे की दिल्लीतल्या '१०, जनपथ' मध्ये नेहरू घराण्याच्या वारसांनी जरा खूण केली

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
५५