शेतकऱ्यांचे मित्र कोण? शत्रू कोण?
खुल्या बाजारपेठेच्या व्यवस्थेत शेतकऱ्यांचे मित्र कोण? व्यापारी हे शतकऱ्यांचे मित्र की शत्रू? याही विषयावर शेतकरी संघटनेने ८० सालापासून निश्चित भूमिका घेतलेली आहे. त्यावेळी सगळे डावे लोक म्हणत असत की, 'शेतकऱ्याला भाव मिळत नाही याचं कारण व्यापारी. शेतकऱ्याला भाव मिळत नाही, ग्राहकाला फार किंमत मोजावी लागते याचं कारण, व्यापारी दोघांनाही लुटतो.' डाव्यांची ही भूमिका असली तरी ८० सालापासून आम्ही हे स्पष्ट केलेलं आहे की, व्यापारी हा शेतीमालाला भाव न मिळण्याचं कारण नाही. शेतकरी संघटनेच्या विचारसरणीत व्यापारी हा कुठं शत्रू नव्हताच. आजपर्यंतची शेतकरी आंदोलनाची सर्व प्रकाशनं तपासून पाहिली तर हे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर, शेतीमालाला भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या हातात क्रयशक्ती येते आणि विकासाच्या चक्राला गती मिळते, व्यापाऱ्यांचा फायदा होतो हे जाणून गावोगावचे व्यापारी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभे रहातात हे आम्ही अनुभवलं आहे.
पूर्वी मला अनेकदा लोकांनी म्हटलं आहे की, 'तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडता पण त्याचबरोबर इतरांचेही प्रश्न मांडावेत. छोट्या उद्योजकांची फार वाईट स्थिती आहे, कारखानदारांचीही मोठी अडचण आहे, एक कारखाना काढायचा झाला तर दिल्लीला किती जणांसमोर जाऊन नाकं घासायला लागतात.' अगदी अलीकडे अलीकडे, शंतनुराव किर्लोस्करांसारखा मनुष्य म्हणाला की, “खुली बाजारपेठ, खुली बाजार पेठ असा शासनाने डांगोरा पिटायला सुरुवात केली आहे; पण त्यांची खुली बाजारपेठ म्हणजे काय आहे? पूर्वी आम्हाला कारखाना काढतांना पंचवीस ठिकाणी जाऊन अर्ज करायला लागत होते, त्याच्या ऐवजी आता बावीस ठिकाणी अर्ज करायला लागतात. एवढाच फरक झाला.” ८० साली सगळ्या लोकांना मी म्हणत होतो की, "मला मान्य आहे की तुमचाही लढा व्हायला पाहिजे. माणसाला स्वतंत्र व्हायचं असेल तर त्याचा लढा फार व्यापक आहे. पण माझी धारणा अशी आहे की स्वातंत्र्याचा हा लढा लढवायचं काम आज शेतकरी करणार आहे. तुम्ही करणार नाही. कारण 'इंडिया'तला तुम्हाला जो काही थोडाफार मलिदा मिळतो त्याच्या मोहाने तुम्ही 'इंडिया' कडे झुकलेले राहाणार आहात.