पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतर समाजव्यवस्था आणि संस्कृती बदलण्याचे काहीच प्रयोजन नाही अशीही प्रतिक्रिया होती. पण, राजकीय मंचांवरील भाषा काहीही असो, इंग्रजांचे राज्य ही उच्चवर्णीयांची मुसलमानी आमदानीत खिळखिळी झालेली पकड पुन्हा एकदा मजबूत करण्याची संधी आहे अशी सवर्णांची कल्पना होती. इंग्रजी वाघिणीचे दूध, त्याचा थोडासा रतीब लावला तरी नोकरशाहीत महत्त्वाचे स्थान मिळते हे जुन्या कारकुनी पेशाच्या ब्राह्मणांनी ओळखले. लेखककवींना इंग्रजी साहित्याच्या भांडारावर हात मारता मारता नकोसे झाले. तसेच, इंग्रजी शास्त्र, तंत्रज्ञान आणि कारखानदारी याचा थोडा, अगदी जुनापुराणा अंश मिळाला तरी तेवढ्या आधाराने कोट्यवधी एतद्देशियांकडून अफाट फायदा मिळवू शकतो हे व्यापारी जनांनी ओळखले. भारतातील ज्ञानाच्या मक्तेदारीमुळे वैराण झालेल्या भूमीवर इंग्रजी व्यवस्थेचे सावट असे आले की सर्वांत मोठे पीक आले ते परभृततेचे. या परभृततेच्या भूताने आमचा पिच्छा अजून सोडलेला नाही.
 आमच्याकडचा विद्वान तो की जो अद्ययावत इंग्रजी, अमेरिकी किंवा इतर पाश्चिमात्य देशात प्रसिद्ध झालेल्या प्रकाशनांशी परिचय दाखवतो! आमचे संशोधक ते की जे बाहेरदेशी झालेल्या संशोधनाची सहीसही नक्कल उठवतात! कोणत्याही क्षेत्रात भारतातील दिग्गज विद्वान, शास्त्रज्ञ म्हणजे पाश्चिमात्य विद्वत्तेच्या आणि शास्त्राच्या सावटाखाली आलेले रोपटे. आचार्य अत्र्यांनी त्यांच्या एका व्यंगकाव्यात तत्कालीन चोरकवींचे वर्णन –
 पुढे कवन लेखनी कुशल चोर तो जाहला
 स्वतंत्र कृतीचा कवी म्हणुनी मान्यता पावला
 असे केले आहे. आमच्यातील बहुतेक स्वयंप्रज्ञ, प्रतिभासूर्य शास्त्रज्ञ- संशोधकांची अवस्था ही अशीच आहे!
'पेटंट' पद्धती आणि भारत

 इंग्रजी अमलाखाली आडगिऱ्हाईकी तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री आयात करण्यात फारशी अडचण येत नसे. आणि असे आणलेले तंत्र आणि यंत्र देशातले कोणी चोरून वापरेल अशी शक्यता फारशी नसल्याने पेटंट संबंधीची नियमप्रणाली १९७० सालापर्यंत अगदीच जुजबी राहिली आणि सध्याचा तद्विषयक कायदा १९७० साली अमलात आला.

३६
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने