Jump to content

पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारण हे की तथाकथित कामगारांच्या हुकुमशाहीत संशोधनाचे बी रुजले नाही, अंकुर फुटले नाहीत, रोपे तरारली नाहीत, पीक निसवले नाही. अवकाशसंशोधनासारखा अपवाद सोडला तर औद्यागिक हेरगिरीवर मदार ठेवणे समाजवादी सत्तेला भाग पडले. थोडक्यात, प्रत्यक्ष यशस्वी होणाऱ्या संशोधकांच्या व्यक्तिगत प्रेरणा कोणत्याही असोत, ऐहिक प्रेरणांनी संशोधनाला बहर येतो हे निश्चित.
संशोधनाचा वाढता वेग
 आगीचा शोध लागावयास एखादे युग गेले असेल, पण आज संशोधन इतक्या वेगाने पुढे जात आहे की वर्षावर्षाला, एवढेच नव्हे तर दिवसादिवसाला आणि तासातासाला शास्त्र आणि विज्ञान मोठमोठे टप्पे गाठत आहे.
भारतात परभृततेचे पीक
भारतातली स्थिती काय?
 काही शतकांच्या अंदाधुंदी आणि अस्थिरतेच्या काळानंतर इंग्रज आले. इंग्रजांच्या एकूण सर्व संस्कृतीनेच भल्याभल्यांना दिपविले. इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर राजकीय बंडखोरी उसळत राहिली तरी इंग्रजांची आर्थिक, सामाजिक आणि शास्त्रीय श्रेष्ठता सर्वमान्य होती. जाती आणि धर्मभेदांनी छिन्नभिन्न झालेल्या भारतातील प्रतिक्रिया काही विशेष होती.
 जपानमध्ये ॲडमिरल पेरीने प्रवेश करून जपानी अहंकाराला धक्का दिला. जपानची प्रतिक्रिया अशी की आम्ही हरलो, कमी पडलो हे खरे आहे; पराजय नाकारण्यात काहीही तथ्य नाही. पण, हा पाश्चिमात्य शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर बळजोरी करतो काय? मग, शास्त्र आणि तंज्ञज्ञान आम्हीही आत्मसात करू आणि असे आत्मसात करू की पश्चिमी जगावरही मात करून दाखवू. जपानने त्याप्रमाणे पाश्चिमात्य शास्त्र आत्मसात करण्याचा यज्ञ आरंभला आणि पुढे जे घडले तो इतिहास सर्वांना ठाऊक आहे.

 भारतातील प्रतिक्रिया याहून नेमकी उलटी. काही लोकहितवादी सोडल्यास एतद्देशियांचा पराभव हा दैवदुर्विलास किंवा चिपळुणकरी चक्रनेमिक्रमाचा आविष्कार आहे असे बहुतेक उच्चभ्रू आणि सर्वण मानत होते. इंग्रजांचा पराजय काय तो राजकीय क्षेत्रात करायचा आहे, त्याकरिता

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
३५